मेनफिचर
शहर टुडे पान चारसाठी
----------
NSK26H30261
जळगाव : महापालिकेकडून तयार केलेले रथ गणेश मंडळांकडून निर्माल्य संकलन करताना.
--------------
निर्माल्य संकलनासाठी शहरात दोन रथ
----
महापालिकेची रात्रीही सुविधा; प्रभागनिहाय फिरणार, नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २१ : श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता व जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने निर्माल्य संकलनाची विशेष व्यवस्था केलेली आहे. गणेशमूर्तीच्या पूजेनंतर जमा होणारे फुले, हार, दुर्वा, पाने, नारळ, पुजेचे इतर साहित्य नागरिकांनी नदी, नाले, तलाव, विहिरी किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता महाननगरपालिकेच्या निर्माल्य संकलन रथातच जमा करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
शहरातील विविध भागांमधून निर्माल्य संकलित करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने दोन रथांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. निर्माल्य संकलन रथ क्रमांक एक प्रभाग समिती क्रमांक एक व दोनच्या कार्यक्षेत्रात, तर रथ क्रमांक दोन प्रभाग समिती क्रमांक तीन व चारच्या क्षेत्रात फिरणार आहे. गणेशोत्सव काळात हे रथ संबंधित भागांमध्ये जाऊन नागरिकांकडून निर्माल्य संकलित करतील.
निर्माल्य संकलन रात्रीदेखील
गणेश मंडळांचे विसर्जन व घरगुती गणपतींचे धार्मिक कार्यक्रम अनेकदा रात्रीच्या वेळी होत असल्याने रात्रीच्या वेळेतही निर्माल्य संकलनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी वाहनचालक सागर बऱ्हाटे, ईश्वर म्हस्के व रात्रीचे निर्माल्य संकलन करणारे चेतन ससाणे यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
जलस्रोतात टाकू नका
निर्माल्य इतर कचऱ्यात मिसळू नये, शिवाय जलस्रोत अथवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये, असे आवाहनही महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. गणेश मंडळांनीही मंडप परिसरात निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून ते संकलन रथाकडे सुपूर्द करावे. नागरिकांच्या सहभागातून स्वच्छ व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.