मंत्रिमंडळ बैठकीत नाशिकची स्थिती मांडणार
दादा भुसे : टंचाईच्या पार्श्वभूमीवर गावनिहाय पाणी-चारा नियोजन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : जिल्ह्यात पावसाने २१ दिवसांहून अधिक काळ ओढ दिल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गावनिहाय पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (ता.२१) दिली.
जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत काही भागांत पाऊस झाला असला, तरी दीर्घ खंडामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा सविस्तर अहवाल मंगळवारी (ता. २२) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने सध्या तातडीची पाणीटंचाईची स्थिती नाही. मात्र, आगामी काळातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी आणि पशुधनाला चारा उपलब्ध व्हावा, यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात येत आहे. काही गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून मागणीनुसार टँकरची संख्या वाढविण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.
पीककापणी प्रयोगांना वेग
मूग व उडदाच्या पिकांचे पीककापणी प्रयोग सध्या सुरू आहेत. सप्टेंबरअखेरपर्यंत इतर पिकांचेही प्रयोग पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात केवळ ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. मात्र, मदत केवळ पीकविमा उतरविलेल्या शेतकऱ्यांपुरती मर्यादित राहू नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.