H30265/H30266
‘सिव्हिल’च्या डॉ. स्वाती चव्हाण यांना कोठडी
---
डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्या प्रकरण : दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या आत्महत्या प्रकरणात संशयित पती व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर यांच्यापाठोपाठ जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांनाही गंगापूर पोलिसांनी अटक केली. सोमवारी (ता. २१) न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, डॉ. नीलेश जेजूरकर व डॉ. चव्हाण यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून शासनाला पाठविण्यात येणार आहे. डॉ. मनीषा जेजूरकर यांनी ६ मार्चला गंगापूर रोड परिसरातील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी रोहिणी वैभव थोरात यांच्या फिर्यादीनुसार डॉ. नीलेश जेजूरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना शुक्रवारी (ता. १८) अटक करण्यात आली असून, मंगळवार (ता. २२)पर्यंत ते पोलिस कोठडीत आहेत. त्यानंतर रविवारी (ता. २०) रात्री डॉ. चव्हाण यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
तपासात डॉ. चव्हाण यांचा आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यात सहभाग आढळल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे तपासी अधिकारी तथा सहायक पोलिस आयुक्त प्रमोद वाघ यांनी सांगितले. डॉ. चव्हाण यांना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, दोन्ही डॉक्टरांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तयार केला आहे. त्यासाठी गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांची तपासी अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली. डॉ. जेजूरकर यांची शुक्रवारीच पालघर येथे बदली झाली होती. मात्र, बदलीपूर्वीच त्यांना अटक झाली.
मानसिक छळाचा आरोप
फिर्यादीच्या जबाबानुसार, डॉ. स्वाती चव्हाण यांनी डॉ. मनीषा जेजूरकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून त्यांच्या पतीला त्या आवडत नसल्याचे, तसेच त्यांच्या बुद्धीची पातळी कमी असल्याचे सांगत अपमान केला होता. डॉ. जेजूरकर हे डॉ. चव्हाण यांच्या सांगण्यावरून वागत असल्याचाही आरोप करण्यात आला. पती आणि डॉ. चव्हाण यांच्या कथित मानसिक छळाला कंटाळून डॉ. मनीषा यांनी आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.