दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर
जिल्ह्यात पावसाची ‘कमबॅक’
जिल्ह्यात जोरदार सरी, पुढील दोन दिवस ‘येलो अलर्ट’
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२१ : शहर व परिसरात दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी (ता. २१) जोरदार पुनरागमन केले. दुपारी अवघ्या अर्ध्या तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरवासियांची धावपळ उडाली. शहरात २४ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. पावसाच्या पुनरागमनामुळे दारणाचा विसर्ग वाढवून २८२५ क्युसेक करण्यात आला असून, हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ दिला आहे.
राजस्थानमधून मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असतानाच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम सोमवारी नाशिक जिल्ह्यात दिसून आला. सकाळपासून शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. दुपारी दोनच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही वेळात रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही धावपळ उडाली. रस्त्यालगतच्या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनाही पावसाचा फटका बसला.
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत पावसाने पुनरागमन केले. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तसेच पेठ-सुरगाणा भागात जोरदार सरी बरसल्या, तर अन्य तालुक्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान, मध्यंतरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी दारणा, गंगापूरसह जिल्ह्यातील ११ धरणांतून विसर्ग सुरूच आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १२८.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात ६४२ मिमी पाऊस झाला असून, हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ६८.७ टक्के आहे.