फोटो : 30273
नाशिक : नामकोच्या अध्यक्षपदी साने व उपाध्यक्षपदी संचेती यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना हेमंत धात्रक, सोहनलाल भंडारी, वसंत गिते आदी.
नामको बँकेच्या अध्यक्षपदी विजय साने
उपाध्यक्षपदी प्रफुल्ल संचेती; १०१ शाखा आणि डिजिटल बँकिंगचा संकल्प
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह (नामको) बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक विजय साने, तर उपाध्यक्षपदी प्रफुल्ल संचेती यांची बिनविरोध निवड झाली. सातपूर येथील बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात सोमवारी (ता.२१) निवड प्रक्रिया पार पडली.
नवनिर्वाचित अध्यक्ष साने यांनी बँकेच्या भविष्यातील विस्ताराचा आराखडा स्पष्ट करताना पाच हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट गाठण्याचा मनोदय व्यक्त केला. शाखांचा विस्तार, स्वच्छ व पारदर्शक कारभारासह अत्याधुनिक मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून बँकेला डिजिटल स्वरूप देण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात बँकेच्या १०१ शाखा करण्याचे उद्दिष्टही त्यांनी जाहीर केले.
या वेळी माजी अध्यक्ष सोहनलाल भंडारी, मावळते अध्यक्ष हेमंत धात्रक, माजी आमदार वसंत गिते, महापौर हिमगौरी आडके, आमदार सीमा हिरे, उपमहापौर विलास शिंदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, सुनील केदार, अविनाश खैरनार, विजय काकड यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.