पोलिसपाटलासह एकाला
४० हजारांची लाच घेताना अटक
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २१ : मुलावर पोलिसांत तक्रार दाखल होऊ नये, यासाठी पोलिसपाटलासह खासगी व्यक्तीला ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली. नवापूर शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याशेजारी ही कारवाई करण्यात आली. या घटनेतील पोलिसपाटील नवापूर तालुक्यातील बिलमांजरे येथील रहिवासी आहे.
मूळ तक्रारदाराचा मुलगा सायबर कॅफेमध्ये काम करीत असताना, एका २३ वर्षीय महिलेशी मुलाची ओळख झाली. त्यानंतर काही दिवसांपासून त्यांचा एकमेकांशी मोबाईलवर संवाद होत होता, तसेच एकमेकांना व्हॉट्सॲप कॉल आणि मेसेज करीत होते. याबाबत महिलेच्या पतीस माहीत झाल्याने महिलेचे पतीशी वाद झाले. त्यानंतर महिलेच्या पतीने बिलमांजरे (ता. नवापूर) येथील पोलिसपाटील गिरीश नान्या मावची (वय ५२) याला भेटून तक्रारदाराच्या मुलाबाबत पोलिसांत तक्रार देण्याबाबत सांगितले. गिरीश मावची व कांतिलाल रुळजी गावित (वय ४६, रा. आमपाडा, ता. नवापूर) यांनी तक्रारदाराला त्यांच्या मुलाची पोलिसांत तक्रार दाखल होऊ नये व प्रकरण मिटविण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील ३० हजार रुपये २९ ऑगस्टला स्वीकारले. उर्वरित ४० हजार रुपये द्यायचे नसल्याने तक्रारदाराने १५ सप्टेंबरला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, गिरीश मावची व कांतिलाल गावित यांनी तक्रारदाराकडे ७० हजारांपैकी उर्वरित ४० हजार रुपये लाच रकमेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी (ता. २१) गिरीश मावची यांनी कांतिलाल गावित यांच्या उपस्थितीत पंचासमक्ष नवापूर शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप पाटील, अंमलदार विलास पाटील, विजय ठाकरे, संदीप खडरे, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले, गितेश महाले यांनी केली.