NHI26A00290
नशिराबाद (ता. जळगाव) : विहिरीतून बाहेर काढलेल्या मोरासह तरुण.
-----------------------------------------------------------------
विहिरीतून सुटका केलेल्या
मोराचा उपचारादरम्यान मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
नशिराबाद (ता. जळगाव), ता. २१ : येथील पार्श्वनाथ पेट्रोल पंपासमोरील एका निर्जन विहिरीत पडलेल्या मोराला तरुणांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान मोराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १९) रात्री उघडकीस आली.
शनिवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास शेतातील विहिरीत मोर पडल्याची माहिती मिळाल्याने नशिराबादच्या तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुपेश महाजन अंधाऱ्या विहिरीत उतरल्यानंतर मोर जिवंत असल्याचे लक्षात येताच त्याला कवेत घेऊन बाहेर काढले. या बचावकार्यात नीलेश माळी, रुपेश माळी, घनश्याम महाजन, चंदू पाटील, कल्पेश चौधरी व प्रतीक महाजन यांनी मदत केली. मोराची सुटका केल्यानंतर तरुणांनी नगराध्यक्ष योगेश पाटील यांना सांगितले. नगराध्यक्षांनी वनाधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, वन विभागाचे पथक वेळेवर पोहोचू न शकल्याने नगराध्यक्ष पाटील यांनी वाहनातून मोराला जळगावच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केल्याने मोराने हालचाल करीत उपचाराला प्रतिसाद दिल्याने तो वाचेल, अशी आशा होती. मात्र, रात्री अकराच्या सुमारास उपचारादरम्यान मोराचा मृत्यू झाला. काही वेळापूर्वीच मृत्यूच्या दारातून बाहेर काढलेल्या या मुक्या पक्षाचा डोळ्यांदेखत मृत्यू झाल्याने बचाव करणाऱ्या तरुणांना अश्रू अनावर झाले. रात्रीच्या वेळी जीवाची पर्वा न करता मोराचा प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या या तरुणांच्या संवेदनशीलतेचे व धाडसाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.