NSK26H30300
जळगाव : सिंधी कॉलनीतील अमरनाथ यात्रेच्या आरासमधील बाबा बर्फानीचा देखावा.
सिंधी कॉलनीत अमरनाथ यात्रेची अनुभूती
गणेश मंडळाची आरास पाहण्यासाठी गर्दी; सजावटीने वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील गणेशोत्सवात यंदा अमरनाथ यात्रेची भव्य आरास साकारण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक संकल्पनांवर आरास साकारण्याची परंपरा मंडळाने जपली असून, यंदाचे हे दहावे वर्ष आहे. अमरनाथ यात्रेची प्रतिकृती आणि आकर्षक सजावटीमुळे परिसरातील भाविकांचे लक्ष वेधले जात आहे.
यंदाच्या आरासीत अमरनाथ यात्रेचा धार्मिक व आध्यात्मिक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अमरनाथ गुहेची प्रतिकृती, परिसरातील सजावट तसेच यात्रेतील विविध धार्मिक संदर्भ भाविकांना पाहता येत आहेत. विशेष म्हणजे आरासीत साकारण्यात आलेली १२ फूट उंच मूर्ती मुंबई येथून आणण्यात आली आहे. भव्य आकारमान आणि आकर्षक स्वरूपामुळे ही मूर्ती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
गणेशोत्सवाच्या दिवसांत सिंधी कॉलनीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आरास पाहण्यासाठी येत आहेत. कुटुंबासह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी सायंकाळनंतर वाढत असून, अनेक जण आरास पाहून अमरनाथ यात्रेच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
चौकट
दहा वर्षांची परंपरा
गेल्या दहा वर्षांपासून सिंधी कॉलनीतील गणेशोत्सवात विविध धार्मिक संकल्पनांवर आधारित आरास साकारली जात आहे. यंदा अमरनाथ यात्रेची संकल्पना साकारून ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. भाविकांना धार्मिक वातावरणाचा अनुभव मिळावा, तसेच अमरनाथ यात्रेची झलक जळगावात पाहता यावी, या उद्देशाने आरास उभारण्यात आली आहे.