टुडे तीन मेन फिचर
---
(ग्रीन कलरच्या ई- बसचे चित्र व एआय इमेज वापरता येईल)
----
ई-बस आगार तयार; चार्जिंग स्टेशनचे काम रखडले
ऑगस्टमध्ये काम सुरू होणे अपेक्षित; महापालिकेने संबंधित कंपनीला दिले पत्र
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी जळगाव शहरात प्रस्तावित असलेल्या ई-बस सेवेसाठी आगाराचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी प्रत्यक्ष सेवा सुरू होण्यापूर्वीच आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे. आगारातील ई-बसच्या चार्जिंग स्टेशनचे काम ऑगस्टमध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित कंपनीकडून अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ई-बसचे संचालन करणाऱ्या कंपनीला तातडीने चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत पत्र दिले आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ई-बससेवा योजनेंतर्गत जळगाव शहरासाठी ५० ई-बस मंजूर आहेत. मेहरुण शिवारातील महापालिकेच्या जलतरण तलावासमोरील सुमारे तीन एकर जागेत सुमारे २० कोटी रुपयांच्या निधीतून ई-बस आगार उभारण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ३०, तर दुसऱ्या टप्प्यात २० बस मिळणार आहेत. या बसच्या संचालनासाठी जेबीएम इको लाइफ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे.
चार्जिंग स्टेशनचे काम कधी?
आगाराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महावितरणकडून एमआयडीसीतील ३३ केव्ही मुख्य वाहिनीवरून वीज जोडणीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर आगारात १० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे. मात्र, दोन ते तीन महिन्यापासून चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू होणे अपेक्षित होते, त्या कामाला कंपनीकडून अद्याप सुरूवात केलेली नाही.
अडथळ्यांची शर्यत
ई-बस सेवा सुरू करण्यासाठी महापालिका आणि संबंधित कंपनीमधील कराराच्या मसुद्याबाबत राज्यस्तरावर काही काळ अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे सेवेला आधीच विलंब झाला आहे. आता कराराच्या प्रक्रियेनंतर चार्जिंग स्टेशनच्या कामाला विलंब होत असल्याने ई-बससेवा सुरू होण्याची मुदत आणखी लांबण्याची शक्यता आहे.
चौकट
अग्निशमन विरोधी यंत्रणेचे काम बाकी
ई-बस आगारात अग्निशमन विरोधी यंत्रणा बसविण्याचे काम बाकी असून या कामाच्या ठरावाला महासभेत मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर निविदा प्रसिद्ध करून ई-बसमध्ये अग्निशमन विरोधी यंत्रणा बसवली जाणार आहे.
चौकट
२३ मार्गांवर धावणार ई-बस
महापालिकेने शहरातील तसेच शहरालगतच्या ग्रामीण भागासाठी २३ मार्ग निश्चित केले आहेत. यापैकी सुमारे १५ मार्ग शहरालगतच्या गावांपर्यंत जाणार आहेत. ई-बस सेवेसाठी १२० वाहक उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया केली आहे. चालक आणि बसची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीकडे राहणार आहे.