(उकाडा, घामाघूम असे स्केच वापरावे)
----
जळगावात भाद्रपदाचा ''उन्हाळा''; उकाडा वाढला
ढगाळ हवामान, पण पाऊस गायब; जळगावकर घामाघूम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : भाद्रपद महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात उन्हाचा चटका जाणवायला सुरवात झाली. अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असले, तरी पावसाची हजेरी नसल्याने दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. सोबतच उकाडा देखील प्रचंड वाढला आहे. सकाळच्या सुमारास वातावरण काहीसे आल्हाददायक असले, तरी दुपारनंतर उन्हाचा कडाका वाढत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
पावसाळ्याचा कालावधी सुरू असतानाही हवामानात सातत्याने बदल होत आहेत. मागील महिना–दीड महिन्यापासून पाऊस गायब झाला आहे. मध्यंतरी दोन दिवस जिल्ह्यात पाऊस झाला. यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. या पावसानंतर मात्र कडक उन्ह पडण्यास सुरवात झाली आहे. गणेशोत्सवात पाऊस येणार अशी आशा होती. परंतु, गणेशोत्सवाचे दिवस देखील तीव्र उन्हातच जात असल्याचे चिंता वाढली आहे.
उकाड्यात प्रचंड वाढ
हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने उन्हासोबतच उकाड्यात देखील प्रचंड वाढ झाली आहे. रात्री देखील उकाडा जाणवत आहे. यामुळे सध्या पावसाळा नसून उन्हाळा सुरू असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. भाद्रपद महिन्यातील कडक उन्हाचा चटका आणखी काही दिवस राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
चौकट
ढग येतात; पाऊस मात्र नाही
दिवसभरात अनेकदा ढगाळ वातावरण निर्माण होत असते. मात्र, ढगांची दाटी होऊनही पाऊस होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आगामी पावसाची अपेक्षा आहे. तर भाद्रपदातील उन्हाचा चटका कायम असून शेतकऱ्यांचे लक्ष आता परतीच्या पावसाकडे लागले आहे. ढगाळ वातावरण आणि त्यानंतर ऊन, अशा बदलत्या हवामानामुळे पावसाचे नेमके स्वरूप काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.