नाशिक विभागातील दुष्काळावर चर्चा
---
कृषिमंत्री भरणे यांची उपस्थिती; पूर्वतयारीवर भर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे नाशिक विभागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत. या अनुषंगाने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे शनिवारी (ता. २६) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या वेळी विभागातील परिस्थितीचा ते आढावा घेतील. कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त प्रशासकीय पातळीवर पूर्वतयारी करण्यात येत आहे.
‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश तालुक्यांत पावसाचे प्रमाण असमान आहे. काही महसुली मंडलांत पावसाने २१ ते ४२ दिवसांचा खंड दिला. परिणामी, खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तसेच, धरणांमधील उपलब्ध साठा पिण्याचे पाणी व जनावरांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. परिणामी, येत्या काळात रब्बी हंगामालाही फटका बसेल. त्यामुळे तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कृषिमंत्री भरणे हे शनिवारी नाशिक रोड येथील विभागीय आयुक्तालयात उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेतील.
मंत्री भरणे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २२) प्रभारी विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागस्तरावरील आवश्यक तयारीचा आढावा घेतला. बैठकीस सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, सहसंचालक (कृषी), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तसेच विविध विभागांचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते.
आयुष प्रसाद यांनी प्रत्येक जिल्ह्याने बैठकीच्या दृष्टीने त्यांच्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेत आवश्यक माहिती तयार ठेवावी, तसेच विभागनिहाय माहितीचे संकलन, आवश्यक आकडेवारी व सद्यस्थितीची माहिती व्यवस्थितपणे द्यावी, कृषी विभागासह संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना केल्या.
बैठकीवर पुढील कार्यवाही
नाशिक विभागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषिमंत्री भरणे मैदानात उतरणार आहेत. शनिवारी त्यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीवर चर्चा होईल. संबंधित जिल्ह्यांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आहे.