फोटो : NSK26H30339
नंदुरबार : कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेले संघ.
---------------
नंदुरबार जिल्हास्तरीय कबड्डी
स्पर्धेला उत्साहात सुरुवात
नंदुरबार, ता. २३ : येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. तालुकानिहाय विजयी व उपविजयी संघांनी यात सहभाग घेतला. शहरातील अभिनव विद्यालयात १४ वर्षांखालील मुला- मुलींच्या कबड्डी स्पर्धांना प्रतिसाद मिळाला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नंदुरबार जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होत आहेत. नंदुरबार येथील अभिनव विद्यालयात कबड्डी स्पर्धेचा प्रारंभ मुख्याध्यापक तारकेश्वर पटेल यांच्या हस्ते झाला. स्पर्धेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विजयी व उपविजयी संघांनी सहभाग नोंदवला. या वेळी मिनल थोरात यांनी खेळाडू, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले. खेळाडूंनी जिद्द, मेहनत, शिस्त आणि संघभावनेच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले. जयदीप नटावदकर यांनी मार्गदर्शन केले. नाणेफेक करून स्पर्धेतील सामन्यांना सुरुवात झाली.
तारकेश्वर पटेल म्हणाले, सर्व खेळाडूंनी खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करावे. खेळामध्ये शिस्त, संघभावना, मेहनत आणि परस्पर सन्मान यांना महत्त्व द्यावे. कबड्डी हा जिद्द, चपळता, ताकद, शिस्त आणि संघभावना यांचा सुंदर संगम असलेला खेळ आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या विजयी व उपविजयी संघांना आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे स्पर्धेत चुरस निर्माण झाली असून, खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. धनराज अहिरे यांनी आभार मानले.