(पान १ ला ॲंकर)
फोटो : NSK26H30357/ NSK26H30365
नंदुरबार : कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलताना ॲड. पदमाकर वळवी. शेजारी केदारनाथ कवडीवाले, डॉ. यू. बी. होले, डॉ. चंद्रकांत पवार, डॉ. मकरंद गुजर, डॉ. राजेंद्र दहातोंडे. दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित शेतकरी, वनट्टेधारक व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी.
------
औषधी, सुगंधी पिकांच्या माध्यमातून पर्यायी उत्पन्नाच्या संधी
कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी- शास्त्रज्ञ संवाद; त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्याचा मानस
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २३ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी पिकांच्या माध्यमातून पर्यायी उत्पन्नाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्रात शाश्वत शेती व उत्पन्नवाढ विषयावर शेतकरी- शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम झाला. या वेळी ‘युएनडीपी’ व ‘एमओई एफसीसी’ यांच्या लॅन्ड डिग्रेडेशन न्युट्रीलिटी प्रकल्पाच्या उद्दिष्टांशी सुसंगत क्षेत्रांच्या पुनर्स्थापनेस हातभार लावण्यावर भर देण्यात आला.
औषधी व सुगंधी पिकांसाठी दर्जेदार लागवड, शास्त्रीय तंत्रज्ञान, तांत्रिक मार्गदर्शन, मूल्यवर्धन व बाजारपेठेशी जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, सीएसआयआर - सीआयएमएपी आणि कृषी विज्ञान केंद्र कोळदे यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाच्या संकल्पनेतून कृषी विज्ञान केंद्रातर्फे ‘आत्मा’च्या सहयोगाने आयोजित या कार्यक्रमात शेतकरी, वनपट्टेधारक, सामूहिक वनहक्क प्राप्त समित्यांचे सदस्य, सामाजिक वनीकरण विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले होते. कृषी महाविद्यालयाचे डॉ. यू. बी. होले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांची या वेळी उपस्थिती होती. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र दहातोंडे यांनी प्रास्ताविक केले.
विभागीय वनाधिकारी डॉ. मकरंद गुजर यांनी नंदुरबार जिल्ह्यात औषधी व सुगंधी पिकांच्या माध्यमातून शाश्वत व पर्यायी उत्पन्नाच्या संधी निर्माण करण्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ऋषिकेश भिसे यांनी ‘ॲरोमा मिशन ४.०’ अंतर्गत उपलब्ध तरतुदी, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ, औषधी व सुगंधी पिकांतील संधी याबाबत मार्गदर्शन केले. सिट्रोनेला ऑईलचा मच्छर प्रतिबंधक कॉइलमध्ये होणारा वापर, जर्नियम ऑईलचा गुलाब तेलाला पर्याय म्हणून होणारा वापर, लेमन ग्रॉसला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असलेली मागणी याबाबत माहिती दिली.
आणंद येथील आयसीएआर- डीएमएपीआरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गणेश खडके यांनी औषधी व सुगंधी पिकांची बाजारपेठ, मूल्यवर्धनाच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. माजीमंत्री व वृक्षप्रेमी ॲड. पद्माकर वळवी यांनी पर्यायी शेतीचा अवलंब, स्थानिक पातळीवर उत्पन्न संधी, ग्रामीण स्थलांतर याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ. सुदाम पाटील यांनी सातपुडा, कोकण, कोल्हापूर तसेच मध्य प्रदेशातील औषधी व सुगंधी वनस्पतींचे संकलन, लागवड व संशोधन याबाबत माहिती दिली. आत्माचे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी आत्माच्या माध्यमातून औषधी व सुगंधी पिकांसारख्या पर्यायी शेतीला बळकटी देण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. खुशाल राठोड यांनी सूत्रसंचालन केले.
----------
माहितीचे दस्तऐवजीकरण व्हावे
उद्योजक गुलाबसिंग गिरासे व ऋषिकेश पवार यांनी औषधी व सुगंधी पिकांची बाजारपेठ, मागणी, व्यावसायिक संधी, उत्पादनाची गुणवत्ता व बाजारपेठ जोडणी याबाबत मार्गदर्शन केले. सातपुडा परिसरातील शेतकरी व स्थानिक जाणकारांकडे उपलब्ध औषधी वनस्पती व स्थानिक जैवविविधतेविषयीच्या अनुभवाधारित माहितीचे दस्तऐवजीकरण व संवर्धन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.