टुडे एक : मेन फिचर
(बातमीत सीसीटीव्ही फोटो मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आल्यावर देतो)
---
‘गोलाणी’चे मोबाईल मार्केट चोरट्यांच्या निशाण्यावर
दुकान फोडले, दोन ठिकाणी कुलूप तोडण्याचा प्रयत्न; ५० हजारांचे फोन लंपास
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : शहरातील मध्यवर्ती व्यापारी संकुल असलेल्या गोलाणी मार्केटमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका मोबाईल दुकानाचे कुलूप तोडून सुमारे ५० हजारांचे मोबाईल लंपास केले, तर अन्य दोन दुकानांत चोरीचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, चोरट्यांनी लक्ष्य केलेले मोठे शोरूम फोडण्यात अपयश आल्याने तेथील सुमारे ४० लाखांचा माल सुरक्षित राहिला.
शहरातील गोलाणी संकुल बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे दिवसभर मोठी गर्दी असते. रात्री उशिरापर्यंतही बहुतांश कार्यालये व व्यापारी प्रतिष्ठाने सुरू असतात. याच मार्केटमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. तळमजल्यावरील दुकान क्रमांक ८ मधील ‘सनशाईन मोबाईल’ला चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानमालक सौरभ खियलदास केसवानी (वय ३०) यांनी रात्री साडेनऊला दुकान बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दहाला दुकान उघडण्यासाठी आले असता, बाजूचे कुलूप व कडी तोडल्याचे निदर्शनास आले. मात्र, दुकानाला असलेले सेंट्रल लॉक तोडण्यात चोरटे अपयशी ठरले. त्यामुळे दुकानातील मोबाईल, ॲक्सेसरीजसह सुमारे ४० लाख रुपयांचा माल सुरक्षित राहिला.
दुरुस्तीचे मोबाईल लंपास
पहिल्या मजल्यावरील ‘विशाल मोबाईल’ दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकटून चोरट्यांनी प्रवेश केला. दुरुस्तीसाठी आलेले सुमारे ५० हजारांचे चार मोबाईल चोरून नेले. काऊंटरचा ड्रॉवरही तोडून किरकोळ रक्कम लंपास केली. दुकानमालक विशाल मधुकर शिंपी (वय ४५, रा. कुसुंबा) सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
चप्पल दुकानही फोडले
पहिल्याच मजल्यावर (सी-१८०) येथील रुद्र फूटवेअर हे चप्पल दुकानही चोरट्यांच्या कचाट्यात सापडले. दुकानाचे साईड लॉक तोडण्यात आले. मात्र, दुकानातील चोरी झालेली नसल्याची शक्यता दुकान मालकाने व्यक्त केली असून दुकानात जवळपास २ ते ३ लाखांचा माल होता.
सीसीटीव्हीत चौघे कैद
चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्याचे काम गुन्हेशोध पथके करीत आहेत. शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
चौकट
शहरातील सर्वच मार्केट ''रामभरोसे''
जळगाव महापालिकेच्या २६ मार्केटचा भाडेकरार संपुष्टात आला असून या मार्केट आणि व्यवसायिकांना कुठलीच सेवा देण्यास महापालिका बांधिल नाही. अगदी दिवाबत्ती, स्वच्छता असो की, मग सुरक्षेचा मुद्दा. कुठल्याच व्यापारी संकुलास सुरक्षारक्षक नाहीत. फुले मार्केट परिसरात व्यापाऱ्यांनी स्वतः काही सुरक्षारक्षक ठेवले आहेत. मात्र, शहरातील बहुतांश मार्केटची अवस्था रामभरोसे अशीच आहे.
चौकट
पोलिस गस्त नाहीच
गोलाणी मार्केट शहरातील मध्यवर्ती व्यापारी संकुल आहे. यापूर्वी या मार्केटमध्ये चार वर्षांपूर्वी एक खून, त्या अगोदर चिमुरडीवर अत्याचाराचा प्रकार घडला होता. तर चाकू लावून लुटीचे प्रकार, तृतीयपंथीयावर हल्ल्याचे प्रकारही वेळोवळी घडलेले आहेत. रात्री मार्केटमध्ये बहुतांश कोपऱ्यात अंधार असल्याने दारुड्यांच्या मैफली या ठिकाणी बसलेल्या असतात. त्यातून होणारी भांडणे, हाणामाऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.