धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त
--
कुटुंबीयांना मारहाण;
चौघांविरुद्ध गुन्हा
धुळे : कावठी (ता. धुळे) येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून घरात प्रवेश करत चौघांनी कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी समाधान शिंदे याने सुनील रामकृष्ण पाटील यांच्या डाव्या डोळ्याजवळ काठीने प्रहार केला. त्यात पाटील जखमी झाले. सुनील पाटील यांच्या फिर्यादीनुसार १७ सप्टेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास संजय नथ्था शिंदे, गिरीष संजय शिंदे, समाधान संजय शिंदे व सुरेखा संजय शिंदे हे त्यांच्या घरी आले. जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांनी वाद घातला. पाटील यांच्या पत्नी व आईला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाद वाढल्यानंतर चौघांनी पाटील यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी समाधान शिंदे याने काठीने त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ प्रहार केला. या हल्ल्यात पाटील जखमी झाले. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध गुन्हा दाखल झाला.
-
दुकान फोडले;
मुद्देमाल लंपास
धुळे : घोडदे (ता. साक्री) येथील हार्डवेअर दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. यात वजन काटा, तीन पाण्याच्या मोटारी, विविध प्रकारच्या तारा, रसवंती मशीन, स्प्रे पंप, रॉड पेट्या, खिडक्या तसेच शेती व बांधकामासाठी लागणारे साहित्य चोरीस गेले. भूषण सुरेश शिरसाट यांचे घोडदे येथे हार्डवेअरचे दुकान आहे. चोरट्यांनी ११ ते १२ सप्टेंबरदरम्यान दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सुमारे १५० किलो तार, ८० किलो सेंट्रिंग तार, तीन पाण्याच्या मोटारी, रसवंती मशीन, स्प्रे पंप मशीन, १८ रॉड पेट्या, २०० खिडक्या, बॉल व्हॉल्व्ह, निपल, टॅप, टिक्कम, कोयता, चुका, फावडा, सुतळी, दोर बंडल व रेन पाईप आदी साहित्य चोरीस गेले. ही घटना लक्षात आल्यानंतर शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-
औद्योगिक वसाहतीत
६०० फूट वायर लंपास
धुळे : नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक टी- ११८ येथील आयपी प्राईम फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या परिसरातून ६०० फूट कॉपर वायर व सुमारे २० लोखंडी अँगल चोरीस गेले. या प्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-
दुचाकींची धडक;
एकाचा मृत्यू
धुळे : पिंपळगाव खुर्द (ता. साक्री) येथील फरशीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रदीप सुधाकर सावंत (वय ४४, रा. डांगशिरवाडे, ता. साक्री) यांचा मृत्यू झाला. प्रदीप सावंत हे दुचाकीने (एमएच १८ सीएफ ७८४०) जात असताना समोरून आलेल्या (एमएच १८ बीके ४४७६) क्रमांकाच्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले. याप्रकरणी विवेक सुधाकर सावंत (रा. डांगशिरवाडे) यांच्या फिर्यादीनुसार पिंपळनेर पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
-