धुळे ः टुडे १ साठी, मेन
--
लोगो छायाचित्र क्रमांक ः 30369
आमळी : परिसरातील काबऱ्याखडक लघु प्रकल्पाचे संग्रहीत छायाचित्र.
--
धुळे सिंचन विभागात कोट्यवधींचा गैरव्यवहार
-
काबऱ्याखडक प्रकल्पाच्या देयकावर कार्यकारी अभियंत्याची बनावट स्वाक्षरी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : येथील पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या काबऱ्याखडक (ता. साक्री) लघुप्रकल्पाच्या कामात बनावट स्वाक्षरीच्या आधारे तब्बल १ कोटी १६ लाखांचे देयक लाटल्याचे गंभीर प्रकरण एका अधिकाऱ्याच्याच तक्रारीतून उघडकीस आले आहे. यात विनाकाम निधीचा अपहार झाल्याने केवळ शासकीय तिजोरीचे नुकसान झालेले नाही, तर साक्री तालुक्यातील शेकडो नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे मानले जात आहे. या हायप्रोफाइल गैरव्यवहारास नऊ महिन्यांहून अधिक काळ लोटूनही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई न करता हे प्रकरण दाबून ठेवल्याचा संशय साक्री तालुक्यातून व्यक्त होत आहे.
-
काबऱ्याखडक प्रकल्पाच्या मुख्य विमोचकाजवळील (आऊटलेट) कठीण खडकातून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी १९ मार्च २०२५ ला ‘ग्राऊटिंग''च्या कामाची निविदा काढण्यात आली. यात ऑगस्ट २०२५ मध्ये या कामापोटी एक कोटी १६ लाख रुपयांचे पहिले धावते देयक विनाविलंब अदा करण्यात आले. मात्र, जलनियोजन विभागाचे (येवा) नाशिकस्थित तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि सध्या लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता नागेश महादप्पा व्हट्टे यांनी १६ सप्टेंबर २०२५ च्या अधिकृत पत्रान्वये या देयकावरील स्वाक्षरी आपली नसून बनावट असल्याचे लेखी कळवले. पाच टक्के तपासणी किंवा देयक मंजुरीची स्वाक्षरी पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या विभागात खळबळ उडाली.
-
पुस्तिकेत परस्पर नोंदी
या प्रकरणातील मोजमाप पुस्तिकेची पाहणी संबंधितांनी केली असता धक्कादायक तांत्रिक बाबी समोर आल्या आहेत. पुस्तिकेत केवळ ‘ग्राऊटिंग’ची नोंद असून, ज्यात महत्त्वाची असलेली ‘ग्राऊट होल ड्रिलिंग’ची कोणतीही नोंद आढळलेली नाही. याउलट पुस्तिकेत ‘ओन्ली ग्राऊटिंग डन, ड्रिलिंग टू बी डन’, अशी शेरेवजा नोंद स्पष्ट असतानाही देयक कसे मंजूर करण्यात आले, असा सवाल उपस्थित होत आहे. तांत्रिकदृष्ट्या ड्रिलिंगशिवाय ग्राऊटिंगचे काम अशक्य मानले जाते. शिवाय, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ५ टक्के क्षेत्रीय तपासणीची अनिवार्य नोंदही या पुस्तिकेत नाही.
-
चौकशी अहवाल दडपला
विशेष म्हणजे २७ जुलै २०२४ ला याच लघु प्रकल्पाला मोठी गळती लागल्याने परिसरातील गावांमध्ये धरण फुटण्याची भीती निर्माण झाली होती. अशा अतिसंवेदनशील ठिकाणी कामाच्या दर्जाशी तडजोड करून सार्वजनिक निधी हडपल्याची तक्रार जळगावस्थित लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता तथा प्रशासक, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, जळगावस्थित तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता, धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आदींकडे वेळोवेळी झाली आहे. परंतु, या प्रकरणी नऊ महिने उलटूनही चौकशी अहवाल दडपल्याचा आरोप व धरणाच्या सुरक्षेसह साक्रीतील जनजीवन धोक्यात येण्याची भिती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. (क्रमशः)
-