ओमकार पवार यांना गडकरी पुरस्कार प्रदान

ओमकार पवार यांना गडकरी पुरस्कार प्रदान
Published on
फोटो : 30385 नाशिक : शासनाचे माजी मुख्य सचिव स्वाधीन एस. क्षत्रिय यांच्या हस्ते एस. एस. गडकरी पुरस्कार स्वीकारताना ओमकार पवार, अश्‍विनी पवार. ओमकार पवार यांना गडकरी पुरस्कार प्रदान जिल्हा परिषदेच्या नवचेतना, पोषणदूत उपक्रमांची राज्यस्तरावर दखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या (आयआयपीए) वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित एस. एस. गडकरी पुरस्कार २०२५-२६ नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथील परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ‘आयआयपीए’च्या महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचे अध्यक्ष तथा शासनाचे माजी मुख्य सचिव स्वाधीन एस. क्षत्रिय यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सीईओ पवार यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘नवचेतना’ अभियान आणि ‘पोषणदूत’ या नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ‘नवचेतना’ अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील एकल महिला, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व प्रौढ अविवाहित महिलांचे सर्वेक्षण करून १ लाख ६ हजार महिलांची माहिती संकलित, वर्गीकृत व मॅप करण्यात आली. त्यांच्या गरजेनुसार रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षण, सामाजिक पुनर्वसन आणि बालसंगोपनाच्या विविध योजनांशी त्यांना जोडण्यात आले. कुपोषणाविरुद्ध राबविण्यात आलेला ‘पोषणदूत’ उपक्रम ‘एक अधिकारी, एक मुलगा’ या संकल्पनेवर आधारित आहे. प्रत्येक कुपोषित बालकाची जबाबदारी एका अधिकाऱ्यावर निश्चित करून बालकाचे वजन, औषधोपचार, लसीकरण, आहार तसेच कुटुंबाच्या अडचणींचा नियमित पाठपुरावा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत १ हजार ९५४ कुपोषित बालकांचे ट्रॅकिंग करण्यात आले असून त्यापैकी ९८४ बालके सामान्य स्थितीत पोहोचली आहेत. तसेच ६११ बालके तीव्र कुपोषणाच्या स्थितीतून बाहेर आली आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी शासनाच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक उत्तरदायित्वातून बालकांचा पाठपुरावा केला. या उपक्रमांची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली. कोट जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी, क्षेत्रीय यंत्रणा आणि या उपक्रमांच्या यशासाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांचा हा सन्मान आहे. शासनाच्या योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम आणि सामूहिक उत्तरदायित्वाची भूमिका महत्त्वाची आहे. -ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
Marathi News Esakal
www.esakal.com