विवाहितेच्या खून प्रकरणी
पतीसह नणंदेला जन्मठेप
----
भुसावळ न्यायालयाचा निकाल; दंड न भरल्यास वर्षाचा साधा कारावास
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. २२ : चारित्र्याच्या संशयातून विवाहितेचा लाकडी ओंडक्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी पतीसह नणंदेला येथील न्यायालयाने मंगळवारी (ता. २२) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अनिल रतन साळुंखे (वय ३८) व सुनीता देवराम पवार (वय ४०, दोघेही रा. पांडुरंग टॉकीजसमोर, कुंभारवाडा, भुसावळ) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये दंडही सुनावली. दंड न भरल्यास प्रत्येकी एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
या प्रकरणातील मृताचे नाव उषा अनिल साळुंखे (वय ३२) असे आहे. शहरातील पांडुरंग टॉकीजसमोरील कुंभारवाडा परिसरात २८ जुलै २०१७ ला सकाळी नऊ ते सव्वादहादरम्यान हा प्रकार घडला. आरोपी अनिल मृत उषाचा पती व सुनीता नणंद आहे. उषाच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्याने डोक्यावर, हातावर, पायावर, पाठीवर व पोटावर मारहाण केल्याने उषाचा मृत्यू झाला. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
१६ जणांच्या साक्षी
पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून २६ ऑक्टोबर २०१७ ला दोषारोपपत्र दाखल केले. २ जुलै २०१८ ला न्यायालयात आरोप निश्चित झाले. खटल्यात ३४ पैकी १६ साक्षीदारांची साक्ष तपासली. सरकार पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता विजय खडसे यांनी काम पाहिले. तत्कालीन सहायक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात तपास झाला.
दरम्यान, आरोपी अनिलने ३० जुलै २०१७ ते ४ ऑक्टोबर २०१८ दरम्यान भोगलेल्या कोठडीतील कालावधीचा शिक्षेतून वजावट (सेट-ऑफ) मिळण्यास तो पात्र असल्याचे आदेशात नमूद आहे. आरोपी सुनीताने ३० जुलै २०१७ ते १२ सप्टेंबर २०१८ दरम्यान भोगलेल्या कोठडीतील कालावधीचा शिक्षेतून वजावट मिळण्यास ती पात्र असल्याचेही आदेशात म्हटले आहे.