महिला वकिलाची सात लाखांत फसवणूक
--------
जळगावात दांत्यासह तिघांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या रकमेवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिला वकिलाची सात लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात पती-पत्नी व आईविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील रामदास कॉलनीतील ॲड. तोषिता ज्ञानेश्वर भिरुड (वय ५३) यांचे शेजारी अतुल भास्कर पाटील, जयश्री अतुल पाटील व सुरेखा भास्कर पाटील ऊर्फ प्रीती दिलीप पाटील (सर्व रा. बांभोरी, ता. धरणगाव) यांची जुनी ओळख होती. जानेवारी २०२५मध्ये संशयितांनी शेअर मार्केटच्या व्यवसायात मोठा नफा मिळवून देण्याचे सांगून भिरूड कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. ॲड. तोषिता भिरूड व त्यांच्या मुलाने ऑनलाईन संशयितांच्या बँक खात्यात लाखो रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला काही महिने नियमित परतावा देऊन संशयितांनी अधिक रक्कम गुंतवण्यास भाग पाडले.
धनादेश न वटणे अन् धमकी
मार्च २०२६पासून संशयितांनी परतावा देणे पूर्णपणे बंद केले. भिरूड यांना संशयितांनी दिलेले धनादेश बँकेत वटले नाहीत. त्यानंतर संशयितने रक्कम परत न करता स्वतः व त्याच्या बायकोच्या नावे गुंतवणूक केली. पैसे परत मागितल्यास खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकीही दिली. सात लाखांत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ॲड. तोषिता भिरूड यांनी दिलेल्या तक्रारीवरून अतुल, जयश्री व सुरेखा पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक अशोक वारुंगसे तपास करीत आहेत.