H30400
नाशिक : माध्यमांशी मंगळवारी संवाद साधताना मनविसे प्रमुख अमित ठाकरे
दुष्काळ जाहीर करा; दौरे थांबवून शेतकऱ्यांच्या बांधावर जा
अमित ठाकरे : नाशिक दौऱ्यात माध्यमांशी संवादाप्रसंगी सरकारवर टीका
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : राज्यात दर ४८ मिनिटांनी एक शेतकरी आत्महत्या करत असल्याचा दावा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेचे शुल्क भरण्यासाठी पैसे नसताना सरकार कशाचा अभ्यास करत आहे, असा सवाल करत दौरे आणि पाहणीचे सोपस्कार थांबवून राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे यांनी दुष्काळ, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ‘ऑपरेशन टायगर’ आणि आमदार-नगरसेवक फोडण्याचे राजकारण थांबवून मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याबाबत यापूर्वी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत, प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नसल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्राकडूनही शेतकऱ्यांसाठी तातडीच्या सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. गणेशोत्सवानंतर शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पेपरफुटीवरूनही सरकारला सवाल
विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात; मात्र ऐनवेळी पेपरफुटीच्या घटना घडतात. यावर संबंधित खाते काय करत आहे, असा सवाल ठाकरे यांनी केला. तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानंतरच सरकारला जाग येणार का, अशी टीकाही त्यांनी केली. सत्ताधाऱ्यांना केवळ २०२९च्या निवडणुकीची चिंता असल्याचा आरोप त्यांनी केला.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा
मागील दौऱ्यात आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. मंत्री विजयकुमार गावित/उईके यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप प्रश्न सुटलेले नसल्याचे ठाकरे म्हणाले. या दौऱ्यात पुन्हा विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंहस्थातील कथित गैरव्यवहाराचा आरोप
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. भ्रष्टाचारासंदर्भातील सविस्तर माहिती आपल्याकडे आली असून, लवकरच नाशिकला येऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.