धुळे ः टुडे १ साठी
--
तीन तालुक्यांत अनधिकृत वीजवापर
-
महावितरणकडून वीज चोरीप्रकरणी सहा जणांवर गुन्हे
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून वीज चोरीविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. निजामपूर व सोनगीर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले.
छावडी (ता. साक्री) येथे तपासणी केली असता उज्ज्वला धनुरे यांनी वीज मीटरच्या सर्व्हिस वायरला टॅपिंग करून हॉटेलसाठी ५५ हजार ३२० रुपयांची वीज चोरी केल्याचे आढळले. लोणखडी (ता. साक्री) येथे पूर्वमुखी एलटी लाईनच्या पोलवरून थेट आकडा टाकून लांब सर्व्हिस वायरच्या साहाय्याने दुकानांसाठी वीज वापरल्याचे तपासणीत समोर आले. याप्रकरणी गोपाल आनंदसिंग राजपूत यांच्याकडे नऊ हजार ४१० रुपये, जितेश संतोष साळवे व विवेक देविदास अहिरे यांच्याकडे प्रत्येकी आठ हजार ९०० रुपये, तर दरबारसिंग नारायणसिंग गिरासे यांच्याकडे आठ हजार ७४० रुपयांची वीजचोरी आढळली. महावितरण कंपनीचे अधिकारी जितेंद्र देवरे यांच्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.
मेहेरगाव (ता. धुळे) येथेही वीजचोरीचा प्रकार उघडकीस आला. महावितरण कंपनीचे सहायक अभियंता आशिष कासार यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत शशीकांत दामू भामरे हे मागील सहा महिन्यांपासून दुकानातील उपकरणांसाठी अनधिकृतपणे वीज वापरत असल्याचे आढळले. त्यांच्याकडे ४९ हजार ७०४ रुपयांची वीजचोरी व १५ हजार रुपयांचा तडजोड आकार अशी रक्कम आढळली. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महावितरणकडून थेट आकडा टाकणे, सर्व्हिस वायरला टॅपिंग करणे किंवा अन्य मार्गाने वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू राहणार आहे.