चाळीसगावात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर
‘आघाडी’चे गटनेते दीपक पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. २२ ः शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मोकाट कुत्रे चावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असतानाही पालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. या संदर्भात गांभीर्याने दखल न घेतल्यास, नागरिकांना सोबत घेऊन पालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पालिकेतील शहर विकास आघाडीचे गटनेते दीपक पाटील यांनी दिला आहे.
या संदर्भात श्री. पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या सध्या कमालीची वाढली आहे. शहरातील विविध भागात मोकाट कुत्रे व गुरांमुळे लहानमोठ्या अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. टोळक्याने फिरणारे मोकाट कुत्रे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर धावून जातात. शहरातील मुख्य रस्त्यांसह सर्वच भागात मोकाट कुत्र्यांपासून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. यापूर्वी १७ एप्रिलला भटके कुत्रे व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात पालिकेला निवेदन दिले होते. त्यावेळी आचारसंहितेचे कारण सांगून पालिकेने नंतर निविदा प्रक्रिया राबवली जाईल, असे दीपक पाटील यांना कळवले होते. मात्र, आता आचारसंहिता संपून देखील या संदर्भात निविदा काढलेली नाही. मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन शहरातील मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ निविदा प्रक्रिया राबवावी. अन्यथा होणाऱ्या घटनांना पालिका प्रशासन जबाबदार राहील. भविष्यात नागरिकांना सोबत घेऊन पालिकेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दीपक पाटील यांनी निवेदनात दिला आहे.
-----------------------------