बांधकामाचा मार्ग मोकळा नव्हे; काम पूर्ण
----
धुळे आरटीओ कार्यालय ः राज्य मंत्रीमंडळाचा औपचारिक निर्णय
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ ः येथील मोहाडी उपनगर परिसरातील भाड्याच्या जागेत आरटीओ कार्यालय आहे. त्यास देवपूरमधील बिलाडी- कुंडाणे (ता. धुळे) रोड परिसरातील सर्व्हे क्रमांक १०३ मध्ये शासनाच्या मान्यतेने जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा मिळाली. असे असतानाही महापालिकेने या जागेवर क्रीडांगण व बगीच्याचे आरक्षण टाकले. पुढे महापालिकेला ही चूक उमगली. त्यामुळे सामंजस्यानंतर आरटीओ कार्यालयाने जागेवर बांधकामाबाबत शासनाकडे पूर्वी सादर केलेला प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंगळवार (ता. २२)च्या बैठकीत मंजूर झाला. ही जागा रितसर जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाल्याने आरटीओने कार्यालयाने वर्षापूर्वी सुरू केलेले बांधकाम पूर्ण झाले आहे. आता फर्निचरचे काम सुरू असून, येत्या २६ जानेवारीला आरटीओ कार्यालय या नवीन जागेत स्थलांतर होण्याची शक्यता असेल.
धुळे शहराच्या मंजूर विकास योजनेतील महापालिका हद्दीतील देवपूर येथील सर्व्हे क्रमांक १०३ वरील क्रीडांगण व बगीचा यांचे आरक्षण रद्द करून ते सार्वजनिक- निमसार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे धुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यक्षात हे काम वर्षापूर्वीच मार्गी लागले आणि बांधकाम पूर्णही झाले आहे. येथील आरटीओ कार्यालय इमारतीच्या बांधकामासाठी महाविकास आघाडीकडून मे २०२१ मध्ये एकूण ११ कोटी ९९ लाख ७८ हजारांचा निधी मंजूर झाल्याची माहिती त्या वेळी असलेले धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील आणि धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी दिली होती.
जिल्ह्याचे मोहाडी उपनगरातील आरटीओ कार्यालय अनेक वर्षांपासून भाडेतत्त्वाच्या इमारतीत कार्यरत आहे. वाहनधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने ही जागा अपूर्ण पडत आहे. त्यामुळे २०१४ पासून आरटीओ कार्यालयास स्वतःची जागा असावी, यासाठी पाठपुरावा सुरू झाला. त्यानुसार सार्वजनिक बाधकाम विभागाने १९ कोटी सहा लाख ८२ रुपयांचा प्रस्ताव मंत्रालयात सादर केला होता. पैकी ११ कोटी ९९ लाख रुपये शासनाने २० सप्टेंबर २०१९ नंतर मंजूर केले. परिणामी, आरटीओ कार्यालयाचे सर्व प्रशासकीय काम आता एकाच इमारतीतून होणार आहे.