भुसावळ ते ठाणे एनसीबी कनेक्शन
-----
संशयिताला पहाटे ताब्यात घेत दिवसभर पोलिसांत कसून चौकशी
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. २२ : खडका रोडवरील मोहंमद अली रोड परिसरातून एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ यास ठाणे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पथकाने मंगळवारी (ता. २२) पहाटे चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयिताची दिवसभर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा त्याला ठाणे येथे नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नशेच्या गोळ्यांच्या प्रकरणातून तपासाला वेग
ठाणे परिसरातील एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान ‘सिद्धीक’ नावाच्या संशयिताकडून नशायुक्त ‘बटण’ नावाच्या गोळ्यांच्या दहा स्ट्रिप जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. संबंधित संशयिताची चौकशी करताना त्याने भुसावळातील एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ याच्याशी वैयक्तिक संबंध असल्याचे तपास पथकाला सांगितल्याचे सूत्रांकडून समजते.
या माहितीच्या आधारे ठाणे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी भुसावळ गाठून एजाज खान याला मंगळवारी पहाटे पाच ते सहाच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेतले.
दिवसभर चौकशी
ताब्यात घेतल्यानंतर एजाज खानला भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सकाळपासून रात्री साडेआठपर्यंत एनसीबीच्या पथकाने त्याची चौकशी केल्याचे सांगण्यात आले. ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्याशी संबंधित विविध बाबींवर त्याच्याकडून माहिती घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर एनसीबीचे पथक संशयिताला घेऊन ठाणे-मुंबईकडे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोठे रॅकेट उघडकीस येणार?
नशायुक्त गोळ्यांच्या प्रकरणाच्या तपासादरम्यान भुसावळातील व्यक्तीचे नाव समोर आल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. एजाज खान याच्याकडून चौकशीदरम्यान कोणती माहिती मिळाली, तसेच त्याचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, या तपासातून नशायुक्त औषधे अथवा गोळ्यांच्या पुरवठ्याशी संबंधित मोठे रॅकेट उघडकीस येते का, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या या प्रकरणातील आरोप व संशयाबाबत अधिकृत तपशील एनसीबीकडून जाहीर करण्यात आलेला नसल्याने पुढील तपासानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.