सप्तश्रृंग गड यात्रेसाठी बसचा मार्ग बदलला
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय : ९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान नवे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : सप्तश्रृंग गड यात्रेनिमित्त नवीन सीबीएस (ठक्कर) बसस्थानकावरून दररोज सुटणाऱ्या २५० जादा एसटी बसमुळे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बसचा मार्ग बदलला आहे. ९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान हा सुधारित मार्ग तात्पुरत्या स्वरूपात लागू राहणार असून, वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी याबाबत सुधारित अधिसूचना जारी केली.
नवरात्रोत्सव व सप्तश्रृंग गड यात्रेच्या काळात गडासाठी दररोज सुमारे २५० जादा बस सोडण्यात येणार आहेत. पूर्वीच्या मार्गावरील त्र्यंबक नाका, खडकाळी सिग्नल, सारडा सर्कल, मदिना चौक, मुंबई नाका व द्वारका परिसरात आधीच वाहतुकीचा ताण असल्याने जादा बसमुळे कोंडी होण्याची शक्यता होती. एसटी महामंडळाच्या विनंतीनंतर वाहतूक पोलिसांनी हा बदल केला आहे.
या मार्गावरील बदलांची एसटी चालक व संबंधित कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.
असा असेल सुधारित मार्ग
सीबीएस ते सप्तश्रृंग गड : नवीन सीबीएस (ठक्कर) बसस्थानक-मेहेर सिग्नल-अशोकस्तंभ-रविवार कारंजा-पंचवटी कारंजा-दिंडोरी नाका-सप्तश्रृंग गड.
सप्तश्रृंग गड ते सीबीएस : दिंडोरी नाका-पंचवटी कारंजा-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-शालीमार-खडकाळी सिग्नल-त्र्यंबक नाका सिग्नल-नवीन सीबीएस.