एसआयआरविरोधातील टॉर्च मार्चपूर्वीच आंदोलकांना ताब्यात
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; अशोकस्तंभ येथे सरकारवाडा पोलिसांची कारवाई
नाशिक, ता. १० : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेमुळे मतदानाच्या हक्कावर निर्माण झालेला धोका आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या अभावाचा निषेध करण्यासाठी काढण्यात येणारा टॉर्च मार्च सुरू होण्यापूर्वीच सरकारवाडा पोलिसांनी विविध सामाजिक, राजकीय व विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांना शनिवारी (ता. १०) सायंकाळी ताब्यात घेतले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह त्यांच्यावर कारवाई करून अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
देशभरात एसआयआर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात आंदोलने सुरू आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शनिवारी सायंकाळी पाचला अशोकस्तंभ येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत टॉर्च मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
या आंदोलनात ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनचे तल्हा शेख, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश महासचिव समाधान बागुल, स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाचे राहूल गायकवाड, प्राजक्ता कापडणे, कैवल्य चंद्रात्रे, छात्रभारतीचे राज्य सदस्य राज माळी, अनुजा तिकांडे, सीजेपीचे कार्तिकेश बोरसे, मुकेश झणके यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मार्च सुरू होत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेले. या वेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध केला. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.
NCTY26B61045
नाशिक : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी टॉर्च मार्च काढताना नाशिककर.
फोटो : H31911
नाशिक : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी अशोकस्तंभ येथून टॉर्च मार्च काढण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेत सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेताना पोलिस.