गोविंदनगरला
तरुणीचा विनयभंग
नाशिक : गोविंदनगर येथे एका तरुणीचा पाठलाग करून, तिला जबरदस्तीने मिठी मारून विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश स्वामी (रा. पाथर्डी फाटा) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताने जानेवारी २०२६ पासून पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केली तसेच पार्किंगमध्ये एकटीला बोलावून बळजबरीने स्पर्श करत विनयभंग केला, असे तक्रारीत नमूद आहे.
--
बंद घर फोडून
ऐवज लांबवला
नाशिक : उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डीजीपीनगर येथील बंद घराच्या दरवाजाचा कोयंडा कापून चोरट्यांनी ७६ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लांबवले. जमीला अख्तार काझी (६३, रा. सुखवस्तू अपार्टमेंट) हे घर बंद करून २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या दरम्यान बाहेर गेले असताना चोरट्याने २० हजारांची रोकड, ३६ हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या आणि २० हजारांच्या चांदीच्या पट्ट्या चोरून नेल्या.
गाडेकर मळ्यातून
दुचाकी चोरीला
नाशिक : नाशिक रोड येथील गाडेकर मळ्यातील दांडिया कार्यक्रमाच्या पार्किंगमधून २५ हजार रुपये किमतीची मोपेड अज्ञात चोरट्याने लांबवली. राजेंद्र भवरीलाल कटारिया (रा. गाडेकर मळा, नाशिक रोड) यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी (ता. १२) रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान कपालेश्वर चौकातील जॉगिंग ट्रॅकजवळील पार्किंगमध्ये पार्क केलेली मोपेड (एमएच १५ जीझेड २७५६) चोरीस गेली. उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
--
दुचाकीस्वाराने
पर्स हिसकावली
नाशिक : मुलाला क्लासला सोडून घरी परतणाऱ्या एका महिलेच्या हातातील पर्स काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या भामट्याने बळजबरीने ओढून नेली. नलिनी अमोल चौधरी (३०, रा. टागोरनगर) या अशोका मार्ग ते रविशंकर मार्ग रस्त्याने खोडे डेअरीजवळून जात असताना २५ ते ३० वयोगटातील दुचाकीस्वाराने त्यांच्या हातातील मरून रंगाची पर्स हिसकावली. पर्समध्ये ८ हजार रुपयांची रोकड आणि ७ हजारांचा मोबाईल असा एकूण १५ हजारांचा मुद्देमाल होता. उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--
भोर मळ्यात घरफोडी
नाशिक : नाशिक रोड येथील जुना ओढा रोडवरील भोर मळ्यात बंद घराचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने १ लाख ५४ हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली. मुनीर निझाम शेख (४९) हे सहकुटुंब मेहुणीच्या घरी मुक्कामी गेले असताना १० ऑक्टोबरच्या मध्यरात्री चोरट्याने मुख्य दरवाजा तोडून कपाटातील लॉकरमधून ३० हजारांची सोन्याची पोत, ४५ हजारांचे झुबे व ४३ हजार ३०० रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरला. नाशिकरोड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
--
दोन महिलांना
मारहाण; मुलीचा विनयभंग
नाशिक : दसक येथे मालमत्तेच्या वादातून दोन महिलांना बेदम मारहाण करण्यात आली तसेच १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी ऋषिकेश रमेश साळवे, विनोद सोनकांबळे, कर्तव्य सोनकांबळे आणि नीतू सोनकांबळे यांच्याविरुद्ध उपनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी महिलांना मारहाण करून १६ वर्षीय मुलीला बेडरूममध्ये ओढून नेऊन तिचा विनयभंग केला व व्हिडिओ काढण्याची धमकी दिली.
--
जुन्या वाहन
विक्रेत्यांवर कारवाई
नाशिक : पोलिस आयुक्तालयाने दिलेल्या नोटिसीचे उल्लंघन करून खरेदी-विक्री केलेल्या जुन्या वाहनांची माहिती न पुरवणाऱ्या द्वारका परिसरातील ५ सेकंड हँड वाहन विक्रेत्यांवर मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ग्लोबल ऑटोचे मालक राकेश मुन्नशेट्टीवार, द कार्स ५८ चे तुषार संचेती, डिलक्स वाहन बाजारचे मिसबहाद्दीन शेख, द बाईक झोनचे फिरोज शहा आणि रुद्र ऑटो मार्टच्या प्रिया मुन्नशेट्टीवार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
--
वडाळा रोडवर
गोमांस जप्त
नाशिक : वडाळा रोडवरील भारतनगर परिसरात बेकायदेशीरपणे गोवंश जनावराचे मांस विक्रीसाठी ठेवल्याचा प्रकार मुंबई नाका पोलिसांनी उघडकीस आणला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून संशयित रिझवान नूर आलम शेख (३०, रा. जुने नाशिक) याच्याकडून सुमारे ४ हजार रुपये किमतीचे २० किलो कातडी काढलेले गोमांस जप्त केले. मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--
तडीपार गुन्हेगाराला अटक
नाशिक : शहरातून तडीपार करण्यात आलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रवीण उर्फ बादल पवन वाघ (२५, रा. एरंडवाडी) याला तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात फिरताना पंचवटी पोलिसांनी पकडले. उपायुक्त परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी त्याला शहरातून तडीपार केले होते. तरीही कोणतीही परवानगी न घेता तो इंद्रकुंड परिसरात आला असता पोलिस शिपायाने त्याला रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला.
--
पोलिसांशी हुज्जत
घालून कामात अडथळा
नाशिक : दारूच्या नशेत पोलिसांच्या डायल ११२ वर कॉल करून विनाकारण हुज्जत घालणाऱ्या आणि शांततेचा भंग करणाऱ्या तीन संशयितांविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल ज्ञानेश्वर झाल्टे (२३), अविनाश शिवनारायण यादव (२४) आणि राममंकेश्वर रामाधार राम (३८, सर्व रा. सातपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कॉलरची माहिती मागून त्यांनी ऑन-ड्यूटी पोलिसांशी वाद घातला होता.