त्र्यंबकेश्वर मंदिर ३१ ला खुले
जिल्हा प्रशासनाची माहिती : ३ हजार पासेसची सुविधा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : सिंहस्थ- कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याला (ता.३१) त्र्यंबकेश्वर मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. पण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणासाठी ३ हजार पासेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. त्यामुळे मंदिर बंद ठेवण्याच्या चर्चांवर पडदा पडला आहे.
त्र्यंबकेश्वर येथे ३१ रोजी कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे. या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू त्र्यंबकेश्वरला भेट देणार असून त्र्यंबकराज मंदिरात व सिंहस्थ ध्वजाचे पूजन त्या पूजन करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव ३० व ३१ तारखेला मंदिर बंद ठेवले जाणार, अशी चर्चा रंगली आहे. परिणामी स्थानिकांसह भाविकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. मात्र, जिल्हाधिकारी प्रसाद यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांचा दौरा लक्षात घेत मंदिर परिसरात गर्दी होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. तीन हजार पासधारकांनाच दर्शनासाठी सोडले जाणार आहे. या सोहळ्यात जल, जंगल, जमिनीचे रक्षक असलेल्या आदिवासी बांधवांना सहभागी करून घेण्यासाठी प्रशासनाने सुक्ष्म नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ध्वजारोहण सोहळ्यासाठी आदिवासी बांधवांसाठी काही पास प्रशासनाने राखीव ठेवले आहे.
रविवारपर्यंत कामांसाठी मुदत
त्र्यंबकेश्वर शहरात ध्वजारोहण सोहळ्यानिमित्ताने विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कुशावर्त तीर्थ व परिसरातील सुशोभीकरण, कुशावर्ताला जोडणाऱ्या मार्गाचे कामे, कुशावर्त भागातील आसन व्यवस्था, स्वच्छतेसह अन्य महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश आहे. ह सर्व प्रकारची ३२ विकासकामे असून ती रविवारपर्यंत (ता.२५) पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.