अंजनेरीत सोमवारी
महानुभाव पंथीय मेळावा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : श्रीक्षेत्र अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे सोमवारी (ता. २६) ‘स्थान, प्रसाद, वंदन, संत- महंत वासनिक भेट तथा महानुभाव पंथीय मेळावा व देवपूजा वंदन, वीडा अवसर, पंचावतार उपहार विधी सोहळा होणार आहे.
३१ ऑक्टोबरपासून सिंहस्थ कुंभमेळ्यास प्रारंभ होत आहे. त्यापूर्वी म्हणजेच २६ ऑक्टोबरला श्रीक्षेत्र अंजनेरी येथे स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक या चतुःसाधनांच्या भेटीचा व वंदनाचा सोहळा सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत होणार आहे. यानिमित्त भाविकांना ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, गंगापूर आणि नाशिक येथील गोदाकाठावरील स्थानवंदनाचा लाभ मिळणार आहे. कार्यक्रमात सकाळी सहाला जिल्ह्यातील सर्व वंदनीय स्थानांना उटी, वीडा अवसर. सकाळी सात ते साडेआठ श्रीमद्भगवत गीतापाठ, पारायण (अंजनेरी येथे). सकाळी सव्वानऊला ध्वजारोहण, सकाळी साडेनऊ ते दहा देवपूजा व स्थानवंदन तथा वैयक्तिक वीडा अवसर. सकाळी दहा ते साडेदहा संत-महंतांचे स्वागत व प्रबोधन. सकाळी पावणेबारा ते साडेबारा संत-महंतांच्या हस्ते महापूजा, पंचावतार उपहार विधी व आरती. दुपारी एकला प्रसाद लाभ हा श्रीचक्रधर स्वामी मंदिर, अंजनेरी (खालचा फाटा ता. त्र्यंबकेश्वर) येथे होणार आहे. जिल्हा निवासी पंथीय भक्त व सर्वज्ञ सेवा महिला मंडळ (नाशिक) यांच्यातर्फे या पवित्र सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.