NSK26H34905
जळगाव : मनपाच्या मलेरिया विभागाचे कर्मचारी धूर फवारणी करताना.
...........
शहरात ‘डेंगी’सदृश तीन रुग्ण
निमखेडी, दादावाडी, नशेमन कॉलनीत फवारणीला वेग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : शहरात ‘डेंगी’सदृश लक्षणे असलेले तीन रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. निमखेडी, दादावाडी आणि नशेमन कॉलनी या तीन भागांत संशयित रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मलेरिया विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला असून, संबंधित परिसरात धूरफवारणी, ॲबेटिंग आणि औषध फवारणीचे काम तीव्र स्वरूपात सुरू केले आहे.
दिवाळीच्या सणानिमित्त नागरिक उत्सवाच्या आनंदात असताना शहरातील सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी पार पाडत आहेत. विशेषतः मलेरिया विभागाकडून डेंगी आणि मलेरियाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी डास उत्पत्तीची ठिकाणे शोधणे, साचलेल्या पाण्यावर ॲबेटिंग करणे, औषध फवारणी आणि धूरफवारणी अशा उपाययोजना केल्या जात आहेत. ‘डेंगी’सदृश रुग्ण आढळलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
चौकट
सांडपाण्याचा त्रास
शहरातील अनेक भाग हे नवीन विस्तारीत असून येथे अद्याप गटारी झालेल्या नाही. त्यामुळे सांडपाणी मोकळ्या जागांमध्ये साचत असल्याने डासांच्या उत्पत्ती यामुळे वाढत आहे. त्यामुळे त्यावर उपायोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.