सेकंडमेन
--------------
(छायाचित्रातील संशयितांची चेहरे स्पष्ट दिसणार नाहीत, असे करावेत)
NSK26H35077 व NSK26H35078
जळगाव : समाज माध्यमात व्हायरल व्हिडिओतील संशयितांचे छायाचित्र.
------------------
पिस्तुल-चॉपरसह आनंदमेळ्यात लोकांना मारहाण
-------
नागरिकांनी पकडलेला ‘एमपीडीए’तील संशयित पोलिसांच्या हातात तुरी देत पसार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : शहरातील नेहरू चौकाजवळील खानदेश मॉल मैदानावर आयोजित आनंद मेळाव्यात गुरुवारी (ता.१२) रात्री पिस्तुल-चॉपर व फायटर घेत संशयितांनी हैदोस घातला. मेळावाचालकाला चॉपर लावून खंडणी मागण्यात आली. त्यानंतर हातात पिस्तुल व चॉपर घेत मेळाव्यातील लोकांना या संशयितांनी मारहाण केली. पोलिसांना लोकांनी पकडून दिलेल्या तीन संशयितांपैकी दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले.
शहरातील पालक आपल्या चिमुरड्यांना गुरुवारी(ता.१२) रात्री दहाच्या सुमारास या आनंद मेळाव्यात घेऊन आले होते. नेमक्या याच वेळेस हातात चॉपर व पिस्तुल घेत सिनेस्टाईल तीन संशयित या आनंद मेळाव्यात शिरले. मेळावाचालक अरबाज शकील शेख हसन (वय २६, रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याला चॉपर लावून आमच्या परवानगीशिवाय मेळावा कसा चालवतोय, असा जाब विचारीत त्यांनी खंडणीची मागणी केली. मात्र, मेळावाचालकाने पैसे देण्यास नकार दिल्याने तिघांपैकी एकाने त्याच्या कानावर चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. मेळावाचालक तसाच जीव वाचवण्यासाठी आत शिरल्यावर तिघे संशयित त्याच्या मागे आत आले. जो मिळेल, त्याला मारहाण करीत मेळाव्यातील दुकानांची त्यांनी नासधूस केली.
एका संशयिताला अटक
याबाबत जळगाव शहर पोलिसांना कळविल्यावर पोलिसांची गाडी घटनास्थळी धडकली. नागरिकांनी पकडून दिलेल्या एका संशयिताला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, त्यापैकी एक संशयित ज्याच्याकडे पिस्तूल होती, नेमका तोच पोलिसांच्या हाती तुरी देत पसार झाला. पोलिसांनी याप्रकरणी जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला असून, संशयित सागर हिरामण कोळी (वय २४, रा. उज्ज्वल चौक, कांचननगर, जळगाव) याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
‘तो’ ‘एमपीडीए’तील संशयित
पोलिसांच्या हाती तुरी देत पसार झालेल्या संशयितावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे. तो, नुकताच कारागृहाबाहेर आला आहे. पिस्तुलीच्या धाकात भर शहरात मेळावा लुटताना सापडला. या घटनेचे मोबाईलवरील चित्रीकरण सध्या समाज माध्यमात व्हायरल झाले आहे.
---------
कोट
या तिघांनी माझ्या आजारी मुलाला बेदम मारहाण केली. पोलिसांच्या हातून हा पिस्तुलधारी निसटून गेला. जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर, मी शहरातील दहशतीबाबत गृहमंत्र्यांची भेट घेत जळगावकरांना या गुंडांपासून वाचवण्याची विनंती करणार आहे.
- खलील पठाण, जळगाव.