धुळे : टुडे पान २ साठी...अँकर
--
‘स्वच्छ शौचालय गरिमामय भविष्य’ अभियानाचा लोगो घेणे...
‘स्वच्छ शौचालय गरिमामय भविष्य’ अभियानास सुरुवात
--
१० डिसेंबरपर्यंत चालणार; महिला, दिव्यांगांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १९ : ग्रामीण भागातील सार्वजनिक, सामुदायिक तसेच संस्थात्मक शौचालयांची कार्यक्षमता, सुरक्षितता व सुलभता वाढवण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत जागतिक शौचालय दिनानिमित्त १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात ‘स्वच्छ शौचालय- गरिमामय भविष्य’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी दिली.
-
दर वर्षी १९ नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिन साजरा होतो. यंदा संयुक्त राष्ट्रसंघाने सुरक्षित शौचालये, समान भविष्य अशी जागतिक संकल्पना निश्चित केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात हे अभियान सुरू असून, १० डिसेंबरला ‘मानवाधिकार दिन’ या दिवशी या अभियानाची सांगता होईल. या अभियानांतर्गत प्रामुख्याने महिला, शालेय विद्यार्थिनी आणि दिव्यांग व्यक्तींच्या गरजांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. ग्रामस्तरावर सार्वजनिक, सामुदायिक व संस्थात्मक शौचालयांची तपासणी करून आवश्यकतेनुसार दुरुस्ती व पुनर्स्थापना केली जाईल. तसेच संबंधित प्राधिकरणे, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी केंद्र आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून देखभाल यंत्रणेला बळकटी दिली जाणार आहे. वैयक्तिक कुटुंबांनाही घरगुती शौचालयांची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
-
याशिवाय मैला गाळ व्यवस्थापन नियमांचे अनुपालन, यांत्रिक पद्धतीने गाळ उपशाचे नियोजन, साबणाने हात धुण्याच्या सवयीचा प्रसार आणि गावचा हागणदारीमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी वर्तन बदल संवाद व जनजागृती मोहिमा राबवल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणच्या शौचालयांची स्वच्छता, किरकोळ दुरुस्ती आणि वैयक्तिक शौचालयांचा शंभर टक्के वापर सुनिश्चित करण्यासाठी सरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी बेलदार, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) निशा जाधव यांनी केले आहे.