(पान ४ ला मेन)
लोगो : ‘सेवा संकल्प अभियान’
---------
आजपासून राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’
नागरिकांना थेट शासकीय सेवांचा लाभ; १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
पी. एन. पाटील : सकाळ वृत्तसेवा
नवलनगर, ता. १६ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजना व सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासोबतच सामाजिक सहभागातून विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश शासन निर्णयातून देण्यात आले आहेत.
-------
अभियानाच्या प्रारंभी प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, पात्र नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळवून देण्यावर भर आहे. महसूल विभागाशी संबंधित फेरफार नोंदी, स्वामित्व सनद, रेशनकार्ड, विविध प्रमाणपत्रे, आधारकार्ड, जन्म-मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी, महिला बचत गट नोंदणी, ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करणे आदी सेवांचा समावेश आहे.
गावागावात ‘सेवा माझे योगदान’
अभियानांतर्गत प्रत्येक गाव व वॉर्डात ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्वांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम, रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, योग-ध्यान, प्लास्टिकमुक्ती, महिला आरोग्य, करिअर मार्गदर्शन, अवयवदान संकल्प, व्यसनमुक्ती जनजागृती, सायबर सुरक्षा, मतदार नोंदणी आणि शासकीय योजनांची माहिती अशा स्थानिक गरजांवर आधारित उपक्रम घेता येणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ
‘विकसित भारत’ संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा शाळांमध्ये घेण्यात येणार आहेत. ‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ आणि ‘विकसित भारत-२०४७’ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेऊन विजेत्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत.
अंगणवाडीत योजनांची माहिती
अंगणवाडी केंद्रांवर मातांसह मुलांचा सहभाग असलेले कार्यक्रम घेऊन महिला आरोग्य व पोषण योजनांची माहिती देण्यात येणार आहे. योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्याचा उपक्रम, तसेच योजनांमुळे जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदल याची दखल घेतली जाणार आहे.
जिल्ह्यातून संकल्प यात्रा
या अभियानातील ‘जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा’ धुळे जिल्ह्यातून जाणार आहे. यात्रेचे स्वागत करून स्थानिक योजना व विकासकामांबाबत संवाद कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायत स्तरावर कला व नाट्य पथकांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देणारे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. २ ऑक्टोबर २०२६ रोजी तालुकास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. उत्कृष्ट कलाकार, विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्याचीही तरतूद आहे.
१७ ऑक्टोबरला अभियानाची सांगता
अभियानाच्या अखेरीस १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘जनसेवक महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत ते संसद स्तरापर्यंतचे लोकप्रतिनिधी सहभागी होऊन विकसित भारताबाबतचे अनुभव मांडतील आणि सेवा संकल्प घेण्यात येईल. त्यानंतर अभियानाची सांगता होईल.
अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावरील समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव असतील. विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत राहणार आहे.