(पान ४ ला ॲंकर)
न्याहळोद परिसरात २८ दिवसांपासून पावसाची दडी
खरीप पिके धोक्यात शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे
सकाळ वृत्तसेवा
न्याहळोद, ता. ३ : यंदाचा खरीप हंगाम उशिराने सुरू झाला. काही दिवस शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गेल्या २८ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने न्याहळोद परिसरातील खरीप पिके संकटात सापडली आहेत. पावसाअभावी मका, कापूस, बाजरी आणि ज्वारी या प्रमुख पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ लागला असून, पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
न्याहळोद परिसरात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर शेतकरी मका, कापूस, बाजरी, ज्वारी आदी पिकांची लागवड करतात. यंदा सुरुवातीच्या काळात उशिराने झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली नाही. यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाबाबत चांगल्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पिकांना पाण्याची गरज
सध्या अनेक ठिकाणी खरीप पिकांची वाढीची अवस्था असून, या कालावधीत पिकांना पुरेशा ओलाव्याची आवश्यकता आहे. मात्र, गेल्या २८ दिवसांपासून अपेक्षित पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी होत चालला आहे. परिणामी मका व बाजरीची वाढ खुंटण्याची शक्यता, तर कापूस पिकावरही पावसाच्या खंडाचा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मका पिकालाही पावसाची आवश्यकता असून, वेळेत पाऊस न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या साधनांचा वापर करून पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; मात्र सर्वच शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची भिस्त पूर्णपणे पावसावर आहे.
खर्च वाढला, आता पावसाची प्रतीक्षा
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत तसेच मजुरीवर मोठा खर्च केला आहे. सुरुवातीला पिकांची परिस्थिती समाधानकारक असल्याने हा खर्च वसूल होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाचा मोठा खंड पडल्याने उत्पादन घटण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
पावसाअभावी पिकांना पाणी देण्यासाठी काही शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. डिझेल, वीज तसेच उपलब्ध विहीर व बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढत आहे.
-------
आकाशाकडे डोळे लावून बसलो आहे. जवळपास २८ दिवसांपासून पाऊस नाही. जमिनीतील ओलावा कमी होत असून मका, कापूस, बाजरी आणि ज्वारीच्या पिकांची चिंता वाटत आहे. आता दमदार पावसाची नितांत गरज आहे.
- देविदास जिरे, शेतकरी