नाशिक हादरले! एकाच दिवसात
तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
मुंबईनाका, अंबड आणि इंदिरानगरमध्ये गुन्हे दाखल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक ता.१५: शहरात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या तीन गंभीर घटना एकाच दिवशी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईनाका, अंबड आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दोन प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार, तर एका प्रकरणात विनयभंग झाल्याचे समोर आले आहे.
मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणात सूर्यकांत वाघ उर्फ अण्णा याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार विरोधी (पोक्सो) कायदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने २०२२ मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास पीडितेला आणि तिच्या आजीला मारण्याची तसेच कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.
अंबड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या दुसऱ्या प्रकरणात निखिल भाऊराव थिटे (वय.२१) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने नात्यातील अल्पवयीन मुलीवर तिच्याच राहत्या घरी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार आहे. तसेच पीडित मुलीने ही बाब कोणाला सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिली. तर इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तिसऱ्या प्रकरणात सुनील कुमार यादव (वय.३६) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने अंधाऱ्या ठिकाणी ओढून नेत तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. पोलिसांनी तात्काळ संशयितास अटक केले.
अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याच्या गेल्या काही दिवसांपासून अनेक घटना घडल्या आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसातील मुंबई नाका पोलिस ठाण्यात हद्दीतील ही दुसरी घटना आहे.