फोटो - 13968
नाशिक : अनधिकृत बांधकाम केलेल्या लॉन्सची पाहणी करताना अधिकारी व कर्मचारी.
---
अतिक्रमण निर्मूलन पथकाचा
लॉन्स धारकांकडे मोर्चा
--
वडाळा, पखाल रोडवर अधिकाऱ्यांकडून सूचना
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. २२ : सारडा सर्कल आणि पंचवटी परिसरानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने आता पखाल रोडवरील लॉन्स धारकांकडे आपला मोर्चा वळविला आहे. मंगळवार किंवा बुधवारी या भागातील अनधिकृत लॉन्स आणि व्यावसायिक दुकानांवर हातोडा पडण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, सोमवारी (ता. २२) महापालिका आणि पोलिस प्रशासनाने संबंधित लॉन्स धारकांना प्रत्यक्ष भेट देऊन अनधिकृत अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या तोंडी सूचना दिल्या.
--
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महापालिकेने शहरात पुन्हा अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्र केली आहे. शनिवारी सारडा सर्कल येथील पक्क्या हॉटेल्ससह सुमारे ८० लहान-मोठ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली, तर सोमवारी पंचवटी भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली. पुढील टप्प्यात पखाल रोड, वडाळा रोड आणि खोडे नगर परिसरातील अनधिकृत बांधकामे टार्गेट केली जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर, सोमवारी सायंकाळी महापालिका नगररचना व अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी या भागाची पाहणी केली. महापालिकेने कारवाई करण्यापूर्वी व्यावसायिक आणि लॉन्स धारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमित शेड व बांधकामे काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
.............