पान तीन ॲंकर
---------
14714
नाशिक : राधाकृष्ण देखाव्यातील ए-आय डिझाईन पडदा.
गणेशोत्सवात ''एआय'' डिझाइन पडद्यांची क्रेझ
३०० रुपयांत फुलणार आरास; थ्रीडी इफेक्टमुळे सर्वाधिक पसंती
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. १० : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा सध्या सर्वत्र बोलबाला असताना, यंदाच्या गणेशोत्सवावरही त्याची स्पष्ट छाप दिसून येत आहे. एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डिझाइन केलेल्या आकर्षक देखाव्यांच्या पडद्यांना नाशिकच्या बाजारपेठेत मोठी मागणी वाढली आहे. केवळ एकच पडदा लावून गणरायची संपूर्ण अन् नयनरम्य आरास साकारता येत असल्याने हे पडदे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे घरगुती गणेशोत्सवाची आरास उभारण्यासाठी नागरिकांना अतिशय कमी वेळ मिळतो. यावर उपाय म्हणून यंदा बाजारात विविध आकर्षक देखाव्यांचे एआय डिझाईन पडदे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. पाच बाय पाच आणि पाच बाय सहा अशा दोन मुख्य आकारांत हे पडदे उपलब्ध आहेत. अत्यंत रंगतदार आणि थ्रीडी इफेक्ट देणारे हे पडदे अवघ्या ३०० रुपयांत मिळत आहेत.
घरात गणपतीची स्थापना केली जाणाऱ्या ठिकाणी पसंतीनुसार केवळ एक पडदा लावून आजूबाजूला एलईडी लायटिंग केल्यास देखावा अत्यंत सुबक दिसतो. यामुळे अवघ्या काही मिनिटांत आरास तयार होत असल्याने विशेषतः नागरिकांकडून या पडद्यांना अधिक मागणी आहे. शहरातील कानडे मारुती लेन, हुंडीवाला लेन आणि मेन रोड भागात हे पडदे मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, यांची आयात इंदूरवरून (मध्य प्रदेश) करण्यात आल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
----------
विविध ५० ते ६० डिझाईन्स उपलब्ध
बाजारात मखर स्वरूप, केळीचे पान, जंगलाचा देखावा, राधाकृष्ण, आकर्षक ओम डिझाईन, पशुपतीनाथ मंदिरासह इतर विविध प्रकारची मंदिरे, भगवान शिव आणि कैलास सरोवर अशा सुमारे ५० ते ६० वेगवेगळ्या आकर्षक डिझाईन्समध्ये हे पडदे उपलब्ध आहेत. यात मखर, केळीचे पान आणि जंगलाचा देखावा असलेल्या पडद्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.
यंदा प्रथमच बाजारात अशा प्रकारचे एआय डिझाईन पडदे विक्रीसाठी आले आहेत. अत्यंत वाजवी दरात पडदा उपलब्ध होत असल्याने आणि आरास करणे सोपे जात असल्याने नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
- सुमोद वडनेरे, व्यावसायिक, नाशिक