वाडीलेची कारागृहात रवानगी
शालार्थ घोटाळ्यात साळुंखेच्या चौकशीतून नवे धागेदोरे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य संशयित प्रशांत वाडीले याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून तो पोलिस कोठडीत होता. दरम्यान, संशयित दीपक गरुड यांच्या जामीन अर्जावर १९ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी तयार करून शासनाच्या वेतनप्रणालीत नोंदी केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने वाडीलेला आज नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
वाडीले पूर्वी शालार्थ आयडी तयार करून देण्यासाठी एजंट म्हणून काम करत होता. त्याच्या माध्यमातून अधिकारी व शिक्षकांशी संपर्क साधून अनेक बोगस आयडी तयार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वाडीले व यापूर्वी अटकेत असलेला तुषार साळुंखे यांनी संगनमताने बोगस आयडी तयार करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचेही तपासात समोर आले आहे.
साळुंखेला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली असून, त्याच्या चौकशीतून घोटाळ्यातील आणखी व्यक्ती व आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, दीपक गरुड यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, १९ सप्टेंबरची सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.