फोटो : A14753
नाशिक : बाप्पाच्या स्वागताच्या आवश्यक खरेदीसाठी कानडे मारुती लेन बाजारपेठेत नागरिकांची झालेली गर्दी
--
गणेशभक्तांचा उत्साह शिगेला
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. १३: विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रविवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसाच्या सरींना न जुमानता भक्तांनी पूजेच्या व सजावटीच्या साहित्यासाठी बाजारपेठेत तुफान गर्दी केली. कानडे मारुती लेन, मेन रोड, दहीपूल आणि रविवार कारंजा परिसरात भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
सोमवारी (ता. १४) घरोघरी गणरायाचे आगमन होत असल्याने रविवारी दिवसभर स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. बाप्पाच्या चौरंगाभोवती आरास उभारण्यात चिमुकल्यांसह घरातील मंडळी व्यस्त होती. सजावटीसाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी रविवारी सुट्टीचा पूर्ण फायदा उठवत सकाळीच नागरिक घराबाहेर पडले. बाजारपेठेत मकर, एआय डिझाईनचे पडदे, आकर्षक रोषणाई, बाप्पाचे दागिने, फेटे, प्लास्टिक फुलांच्या माळा, तोरणे, रंगीबेरंगी झुंबरे आणि नक्षीदार कापड खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू होती. यातील बहुतांश वस्तू कानडे मारुती लेनमध्ये मिळत असल्याने तेथे पाऊल ठेवायलाही जागा नव्हती. तयारीचा शेवटचा दिवस असल्याने तुफान गर्दीमुळे मेन रोड आणि कानडे मारुती लेनवर पायी चालणेही कठीण झाले होते. पावसातही ग्राहकांच्या उत्साहात काहीच कमी नव्हती. या गर्दीमुळे व्यापाऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण असून रात्री उशिरापर्यंत बाजारपेठा गजबजलेल्या होत्या. सकाळी खरेदीसाठी नागरिक बाहेर पडताच पावसाने हजेरी लावली; मात्र छत्री हातात धरून नागरिकांनी खरेदी सुरूच ठेवली. दुसरीकडे रस्त्यावरील विक्रेत्यांनीही मालाचे रक्षण करण्यासाठी दुकानांवर मोठ्या छत्र्या उभारल्या होत्या. यामुळे संपूर्ण बाजारपेठेत रंगीबेरंगी छत्र्यांचे छत्र तयार झाले असून, जणू छत्र्यांची जत्रा भरल्याचा भास होत होता.