फोटो : A14787
नाशिक : अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत जेसीबीच्या साह्याने काढण्यात आलेले अतिक्रमण
--
वडाळ्यातील गोमांस विक्री दुकान जमीनदोस्त
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, इंदिरानगर, ता. १६: महासभेत पूर्व विभागातील अतिक्रमणाचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लगेचच वडाळ्यासह विविध ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावरील व्यावसायिक आणि इतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला. रजा चौक परिसरात गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर इंदिरानगर पोलिस आणि पूर्व विभागाचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्त कारवाई करत गोमांस विक्री दुकानावर जेसीबी चालवला. कारवाईत १५ हजारांचे ५० किलो गोमांस जप्त करण्यात आले.
वडाळ्यातील आलिशान सोसायटी परिसर, पांडवनगरी, म्हाडा वसाहत परिसरात बुधवारी (ता. १६) पूर्व विभागाकडून अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. कारवाईत एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान, एका इमारतीच्या कोपऱ्यावर गोमांस विक्री सुरू असल्याची इंदिरानगर पोलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दुपारी ठिकाणी छापा टाकला. अतिक्रमण पथकास बोलावून संबंधित दुकान जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. कारवाईत अक्रम इमाम कुरेशी (५८), मुजम्मील नुरोद्दीन शेख (३७), गुफरान सुभान सय्यद (५८) आणि अमजद शेख कुरेशी (४०) यांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून ५० किलो गोमांस जप्त करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच काही गोरक्षक घटनास्थळी जमा झाले. त्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी चौघांविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.