पान चार
-----------------
14846
नाशिक : सभेत पत्रक वाचून दाखवताना नगरसेवक शाहू खैरे.
गोदावरी प्रदूषण अन् मोकाट कुत्र्यांचा प्रश्नावर चर्चा
पश्चिम प्रभाग समिती बैठक; तातडीने पाहणी करून काम पूर्ण करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. २२ : गाडगे महाराज पूल ते रामसेतू पुलादरम्यान नवीन ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. ड्रेनेज लाइन उघडी असल्याने त्यातील दूषित पाणी थेट गोदावरी पात्रात मिसळून नदीचे प्रदूषण होत आहे. यावर काय उपाययोजना केल्या तसेच मोकाट कुत्र्यांवर काय कारवाई केली याबाबत जाब विचारला. यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
पश्चिम प्रभाग समितीची सभा सभापती सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभार उघड केला. गाडगे महाराज पूल ते रामसेतू पुलादरम्यान नवीन ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. ड्रेनेज लाइन उघडी असल्याने त्यातील दूषित पाणी थेट गोदावरी पात्रात मिसळत आहे. तसेच बांधकामाचे लोखंडी गजामुळे अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे असताना देखील महापालिका प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? हे काम का रखडले आहे? असा सवाल नगरसेवक शाहू खैरे यांनी केला. यावर अधिकाऱ्यांनी चेंबर बांधल्याचा दावा केला; मात्र प्रत्यक्षात कुठलेही काम झाले नसल्याचे नगरसेवकांनी उघडकीस आणले. यावर सभापती सुरेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करत काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
मोकाट कुत्र्यांच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांची कोंडी
त्यानंतर शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर चर्चा झाली. पडकी घरे, मोकळे वाडे आणि मैदानांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या झुंडी साचत असून नागरिकांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी दिलेले उत्तर असमाधानकारक असल्याने नगरसेवक व सभापतींनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोकाट कुत्र्यांना बंदिस्त करण्यासाठी नियोजन सुरू असून येत्या काही महिन्यांत ते पूर्ण होईल, असे स्पष्टीकरण डॉ. सोनवणे यांनी दिले. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना अन्न देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
----------
‘सकाळ’च्या वृत्ताची दखल
गाडगे महाराज पूल ते रामसेतू पुलादरम्यान नवीन ड्रेनेज लाइनचे काम अपूर्ण असल्याने दूषित पाणी थेट गोदावरी पात्रात मिसळत आहे. याबाबत ‘सकाळ’चे प्रतिनिधी यांनी सोशलमिडियावर वृत्त प्रसारित केले. या वृत्ताची दखल नगरसेवक शाहू खैरे यांनी घेत हा प्रश्न सभेत उपस्थित केला.