पान चार
--------------
14850
नाशिक : अतिक्रमण पथकाशी वाद घालताना व्यावसायिक.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकावर हल्ला
धुमाळ पॉंईट येथील घटना; गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक ता.२२: मेन रोड धुमाळ पॉईंट येथे अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पथकावर येथील व्यावसायिकांकडून हल्ला करत मारहाण करण्यात आली. मंगळवारी (ता.२२) सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.
मेन रोड, शालिमार आणि धुमाळ पॉईंट ते दहिपूल भागात पश्चिम विभागाच्या पथकाकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होती. इतर ठिकाणची कारवाई करत पथक धुमाळ पॉईंट परिसरात दाखल होऊन रस्त्याला अडथळा ठरणारे साहित्य जप्त करत होते. साहित्य जप्त करण्यात आलेल्या व्यवसायिकांनी अचानक पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करत मारहाण केली. त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
घटनेची माहिती पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. इतर व्यावसायिकांनीही त्या ठिकाणी गोंधळ घातला. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करत अतिक्रमण पथकास सरकार वाडा पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले. व्यवसायिकाचे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देखील यावेळी एकमेकांसमोर आल्याने तणावात वाढ झाली होती.
यापूर्वी येथील अनाधिकृत व्यावसायिकांकडून अशा प्रकारे अतिक्रमण पथकासह सामान्य नागरिकांशी वाद घालण्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी घडलेल्या घटनेनेही परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याने पथकाने सरकारवाडा पोलिस ठाण्याचा मार्ग धरला.