OZM26B13919
--------
२०-१
इस्रोच्या सहलीसाठी
अनुष्का डेर्लेची निवड
---------
शिंगवे शाळेची घोडदौड
ओझर, ता. १५: शिंगवे (ता. निफाड) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्ता, उपक्रमशीलता आणि विद्यार्थीकेंद्रीत शिक्षणपद्धतीचा ठसा राज्यभर उमटवत बीटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या अनुष्का ज्ञानेश्वर डेर्ले हिने 150 पैकी तब्बल 148 गुण मिळवत राज्याच्या गुणवत्ता यादीत आपले नाव कोरले. तिची प्रतिष्ठित ‘इस्रो’ सहलीसाठी निवड झाली आहे.
राज्यस्तरावर एज्युमेट एज्युकेशन संस्थेमार्फत घेण्यात येणारी बीटीएस (भारत टॅलेंट सर्च) प्रज्ञाशोध परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची खरी कसोटी मानली जाते. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होतात. या परीक्षेत दुसरीतील दिव्या पवार, शिवन्या डेर्ले आणि स्मिती मोगल यांनी निफाड तालुक्यात प्रथम तीन क्रमांक पटकावत शाळेच्या यशात भर घातली. चौथीतील पार्थ हर्षद डेर्ले व सार्थक मोगल यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवत गुणवत्तेची परंपरा कायम राखली.
विशेष म्हणजे, शाळेतील एकूण 56 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत शाळेने शंभर टक्के निकालाची गौरवास्पद कामगिरी केली. दुसरीसाठी प्रकाश चव्हाण व श्रीमती सोनाली देवरे, तिसरीसाठी सुनयना मगरे, तर चौथीसाठी दिलीप बोंबले व दिलीप बागडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
------------