ओझर ः अटक केलेल्या संशयितांसह पोलिस पथक.
फोटो- 14602
ओझर चोरी प्रकरणी
चोरट्यांना मध्य प्रदेशातून अटक
सकाळ वृत्तसेवा
ओझर, ता. ६ ः येथील पंचवड गणेश मंदीराजवळ निर्मल स्वीट येथे गेल्या जूनमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी राकेश शिवप्रसात शर्मा (रा. सावित्री हॉटेलमागे, ओझर) यांच्या दोन तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या दोन साधूंच्या वेशातील संशयितांनी लांबविल्या होत्या. या प्रकरणी ओझर पोलिसांत गुन्हा दाखल होता. सदरचा प्रकार भरदिवसा घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला. ४५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील हालचाली तपासत तसेच तांत्रिक विश्लेषनाचे आधारे पोलिसांनी अखेर मध्य प्रदेशात संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून संशयित जालीमनाथ कालुनाथ, बंधननाथ माधुनाथ (दोन्ही रा. कसराबाद, ता. कसराबाद, जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मध्य प्रदेशात जाऊन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख ८० हजारांचे वितळविलेले सोने हस्तगत केले. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती विमला एम., उपविभागीय अधिकारी संजय बांबळे, प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रविंद्र खाडे, जितेंद्र बागूल, नीलेश वाघ, हवालदार हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
.............