३६-३
ओझरला मोकाट वराहांवर कारवाई
नागरिकांना दिलासा : पहाटेच्या कारवाईत ६० वराह जेरबंद
-------------
ओझर, ता.८ : शहर, उपनगर आणि ओझर टाउनशिपमधील नागरी वसाहतींमध्ये उच्छाद मांडणाऱ्या मोकाट वराहांवर अखेर नगरपरिषदेने धडक कारवाई केली. शनिवारी पहाटे पाचला सुरू झालेल्या या मोहिमेत तब्बल ६० वराह पकडण्यात आले. या कारवाईमुळे वराहांच्या त्रासाला वैतागलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
ओझर टाउनशिपमधील नागरी वसाहतीसह लक्ष्मीनगर, यमुनानगर, निवृत्तीनाथनगर, साईधाम, लोहियानगर गणेशनगर, एरिकेशन कॉलनी आदी भागांत वराहांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला होता. रस्ते, गल्लीबोळ तसेच नागरी वसाहतींमध्ये मोकाट फिरणाऱ्या वराहांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येबाबत सत्ताधारी तसेच विरोधी गटातील नगरसेवकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन देत मोकाट वराहांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.
मुख्याधिकारी किरण देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष यतीन कदम, नगरसेवक महेश शेजवळ व राकेश जाधव, आरोग्य विभागाचे गणेश महाजन, प्रकाश महाले नितीन काळे, किरण कुदे, रोशन कदम आणि सचिन आढाव यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान वराहांपाठोपाठ आता भटक्या श्वानांचाही बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
--------------
कोट
मोकाट वराह तसेच श्वानांबाबत नगरसेवक आणि नागरिकांच्या तक्रारी नगरपरिषदेला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार वराहांचा बंदोबस्त करण्यात आला. लवकरच भटक्या श्वानांचाही बंदोबस्त केला जाईल.
- रूपाली महाले, उपनगराध्यक्ष, ओझर
--------------