ओझरच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
सायखेडा फाटा येथील अतिक्रमणावर नगर परिषदेचा बुलडोझर
ओझर, ता. १३ : सायखेडा फाटा येथील राजे छत्रपती चौक परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर चौकाने जणू काही मोकळा श्वास घेतला असून, परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
राजे छत्रपती चौक हा परिसरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून, परिसरात अतिक्रमण वाढल्याने वाहतूक कोंडी होत होती. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत होती. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होत होती. अतिक्रमणामुळे चौकातील वाहतुकीवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत होत्या. तसेच पादचाऱ्यांना रस्त्यावरून मार्ग काढताना अडचणी येत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली.
कारवाईदरम्यान चौक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यामुळे रस्त्याचा मोठा भाग मोकळा झाला आहे. कारवाईनंतर परिसराचे स्वरूपही बदलले असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. दरम्यान, अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच चौकातील वाहतुकीचे योग्य नियोजन, पार्किंग व्यवस्था आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.
अतिक्रमणमुक्त झालेला राजे छत्रपती चौक आता अधिक सुरक्षित होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.