OZM26B14653, OZM26B14654, OZM26B14655
ओझर ः सायखेडा फाटा येथे राजे छत्रपती चौकातील अतिक्रमण केलेल्या टपऱ्या उचलताना कर्मचारी.
---
राजे छत्रपती चौकातील अतिक्रमणांवर हातोडा
नगर परिषदेची कारवाई; वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
ओझर, ता. १२ : सायखेडा फाटा येथील राजे छत्रपती चौक परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमणांवर नगर परिषदेने शुक्रवारी (ता. ११) मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर चौकाने मोकळा श्वास घेतला असून, जेसीबी, ट्रॅक्टर व अग्निशमन दलाच्या वाहनाच्या सहाय्याने टपऱ्या, दुकानांसमोरील शेड्स व अन्य अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या वेळी नगर परिषदेच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक उपस्थित होते.
राजे छत्रपती चौक हा ओझर शहर व उपनगरांना जोडणारा प्रमुख वाहतूक मार्ग आहे. अतिक्रमणांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या.
मुख्याधिकारी किरण देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता ऋतुजा अंभोरे, विजय सोनवणे, तसेच नगर परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी साडेदहापासून मोहीम राबविण्यात आली. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष यतीन कदम व नगरसेवकही उपस्थित होते.
कारवाईनंतर चौकातील वाहतुकीला मोकळा श्वास मिळाला असून, पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित पाहणी, पार्किंगचे नियोजन आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अतिक्रमण निर्मूलन मोहिमेप्रसंगी नगर अभियंता सुनील पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुटे, नगर परिषदेचे जयश्री मोगल ऐश्वर्या वैरागर, अविनाश गवळे, ऐश्वर्या सानप, राहुल शिंदे, शाहीद पठाण, साधना ढेपले, कृष्णा गांगुर्डे, साधना खराटे, नगरसेवक महेश शेजवळ, राजू भडके आदी उपस्थित होते.