ओझर महाविद्यालयामध्ये
‘आविष्कार संशोधन’ स्पर्धा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
ओझर, ता १६ : विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, सर्जनशीलता व नवोपक्रमाला चालना देण्याच्या उद्देशाने मविप्र संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अविष्कार स्पर्धा–२०२६’ उत्साहपूर्ण झाली.
स्पर्धेत कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील एकूण ८२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या महाविद्यालय स्तरावरील आविष्कार स्पर्धेमध्ये एकूण ४२ संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.डी.लोखंडे होते. स्पर्धेसाठी प्रमुख परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉ.व्ही.जी.गायकवाड, डॉ.मिलिंद मेश्राम उपस्थित होते.
आजचे युग हे माहिती तंत्रज्ञान व स्पर्धेचे युग आहे मानवी जीवनशैली झपाट्याने बदलत आहे बदलत्या काळाची पाऊले ओळखून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, त्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागावी यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाची भूमिका पार पडतात असे प्रतिपादन डॉ.गायकवाड यांनी केले.
डॉ.मेश्राम यांनी अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो त्यांच्यामध्ये संघभावना वाढीस लागते, नवनवीन संकल्पना उदयास येतात असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. डी. एस. बोराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम प्रसंगी प्रा.एस.के.आवारे, डॉ.आशा कदम, डॉ.एम.डी.दुगजे, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ.मंगेश दुशिंग यांनी प्रास्ताविक, प्रा. हर्षला बोरस्ते यांनी सूत्रसंचालन तर डॉ.एम.डी.ढिकले यांनी आभार मानले.