ओझरला भांडवली मूल्याधारित करप्रणालीला विरोध
करवाढीला तूर्त स्थगिती देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
ओझर, ता. २० ः ओझर नगर परिषदेच्या प्रस्तावित ‘भांडवली मूल्याधारित करप्रणाली’ला राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक प्रमोद कुटे यांनी विरोध केला. नगर परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर असलेल्या करप्रणालीच्या विषयाच्या पार्श्वभूमीवर कुटे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत नवीन करप्रणाली लागू करण्यास तूर्त स्थगिती देण्याची मागणी केली.
नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर मालमत्ता कराच्या रचनेत स्वच्छता कर, पथदीप कर, वृक्ष कर, शिक्षण कर आणि रोजगार हमी कराचा समावेश करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. यात खुल्या भूखंडांवर १२, निवासी इमारतींवर १७, तर व्यावसायिक गाळ्यांवर ६८ टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जुन्या नोंदणीकृत मालमत्ताधारकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून, जुन्या मालमत्तांचे करदर कायम ठेवावेत, अशी मागणी कुटे यांनी केली.
गोदामे, शीतगृहे, शेड, गोठे, शिक्षण संस्था, व्यायामशाळा तसेच दवाखान्यांना कर आकारणी करताना सवलतीचे दर लागू करावेत, अशीही मागणी निवेदनात केली आहे. घरगुती सौर उपकरणे बसविणाऱ्या नागरिकांना तसेच आगाऊ मालमत्ता कर भरणाऱ्यांना नाशिकच्या धर्तीवर करसवलत देण्याची सूचनाही केली आहे.
इमारतीच्या वयोमानानुसार घसारा मूल्य विचारात घेऊन मालमत्ता करात सवलत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
करवाढ न करता नगर परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी करचुकवेगिरी करणाऱ्या मालमत्ता धारकांना कराच्या कक्षेत आणणे, थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविणे, शहरातील होर्डिंग्ज व जाहिरातींच्या कर वसुलीबाबत धोरण तयार करणे, निवासी मालमत्तांचा व्यावसायिक वापर होत असल्यास त्यांच्याकडून व्यावसायिक दराने कर आकारणी करणे, असे पर्याय निवेदनात देण्यात आले आहेत.
इतर नगर परिषदांमधील कररचनेचा अभ्यास करून ओझर नगर परिषदेसाठी योग्य करप्रणाली निश्चित करण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते तसेच नगरसेवकांचा समावेश असलेली समिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
करप्रणालीचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत नवीन करपद्धती लागू करू नये आणि करवाढीचा विषय सर्वसाधारण सभेत तूर्त स्थगित ठेवावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर गटनेते प्रमोद कुटे, उषा गवळी, अशोक कदम, शिल्पा पगारे-ढेंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.