फोटो : B11903
वडाळा : दुभाजकावर चढलेली घंटागाडी
--
शंभरफुटी रस्त्यावर
घंटागाडी दुभाजकावर चढली
वडाळागावात गतिरोधकाअभावी नागरिक हैराण
इंदिरानगर, ता. १५ : वडाळा गावातून जाणाऱ्या शंभरफुटी रस्त्यावर मांगिरबाबा चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे. गतिरोधक नसल्याने रोज येथे किरकोळ अपघात सुरू झाले आहेत. शुक्रवारी (ता.१५) देखील एक घंटागाडी थेट दुभाजकावर चढली. क्रेनद्वारे ती बाजूला करण्यात आली.
द्वारका सर्कल येथे अंडरपासच्या कामामुळे पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळागाव, इंदिरानगर, वडाळा पाथर्डी रस्त्याने जातात. जुने वडाळा गाव व नवीन वडाळा गावातील सादिकनगर, मेहबूबनगर, गुलशननगर, मुमताजनगर, अण्णाभाऊ साठेनगरसह परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी या चौकातून मार्गक्रमण करावे लागते. मात्र, वर्दळीमुळे हा चौक धोकादायक झाला असतानाही अद्यापही या ठिकाणी गतिरोधकाचा विचार होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. बेफाम वेगाने वाहने जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. त्यातूनच लहान-मोठे अपघात घडत आहेत. कोणत्याही गंभीर अपघाताच्या घटनेची वाट न पाहता तातडीने मांगिरबाबा चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.